योगी आदित्यनाथ यांचे विधान : हिंदू विरोधकांना मोदी नापसंत
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. आता सर्व पक्षांनी प्रचारावर जोर दिला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. कुठलाही भारतविरोधी किंवा हिंदूविरोधी घटक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा स्वीकार करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही लोक अद्याप गैरसमजाचे शिकार असून ते उत्तरप्रदेशवर स्वतःची आकडेवारी थोपवत आहेत. ही निवडणूक 80 विरुद्ध 20 अशी होणार आहे. 80 टक्के समर्थक एका बाजूला (भाजप) असतील, तर 20 टक्के समर्थक दुसऱया बाजूला असणार आहेत असे योगी म्हणाले.
हिंदूविरोधी घटक पूर्वी देखील माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते आणि यापुढेही ठेवणार नाहीत. जर मी माझे शिर कापून अशा लोकांसमोर ठेवले तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आम्हाला अशा लोकांची पर्वा नाही, कारण माझी प्रतिबद्धता पूर्ण उत्तरप्रदेशातील जनतेशी आहे. राज्यातील लोकांना सुरक्षा मिळावी, कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे अशाप्रकारचे लक्ष्य बाळगून आमचा पक्ष वाटचाल करत असल्याचे योगींनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक 80 विरुद्ध 20 अशीच होणार आहे. यात 80 टक्के लोक सकारात्मक ऊर्जेसह पुढे जातील आणि 20 टक्के लोक नेहमीप्रमाणे विरोध करतील असे उद्गार त्यांनी काढले आहेत. राज्यात 10 फेब्रुवारीपासून मतदानाला प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान पश्चिम उत्तरप्रदेशपासून सुरू होणार आहेत. राज्यात एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.