विपुल फडकेचं पॅनल जाहीर : क्रिकेटपटू, क्लब्स, साधनसुविधांच्या निर्मितीवर राहाणार भर : जीसीएतील सर्व व्यवहारात पारदर्शकता
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
राज्यातील 80 टक्के क्रिकेट क्लबांचा पाठिंबा आम्हाला आहे. जीसीए सलंग्नीत क्लबांनी मागील तीन वर्षांत आमचं काम बघितलं आहे. येत्या 27 ऑक्टोबर रोजी होणाऱया जीसीए व्यवस्थापकीय मंडळाच्या निवडणूकीत माझ्या पॅनलचा विजय निश्चित आहे. या पॅनलला जीसीएचे माजी अध्यक्ष आणि सचिव बाळू फडके यांचा आशिर्वाद असल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि पॅनलचे प्रमुख विपुल फडके म्हणाले.
काल पर्वरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्षपदाचे उमेदवार विपुल फडके यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्याने आपल्या कारकिर्दीत झालेल्या आणि यापुढे होणाऱया राज्यातील क्रिकेटच्या उत्कर्षांबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत उपाध्यक्षपदाचे उमेदवार मांगिरीष क्रिकेट क्लबचे अनंत नाईक, संयुक्त सचिवपदाचे उमेदवार अल-फताह क्रिकेट क्लबचे अध्यक्ष जमीर करोल, खजिनदारपदाचे उमेदवार शिरोडा क्रिकेट क्लबचे सैबर मुल्ला तसेच आपण विपुल फडकेच्या पॅनलमधील सचिवपदाचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असल्याचे काल जाहीर केलेले खोर्ली इलेव्हनचे रोहन गावस देसाई यावेळी उपस्थित होते. सदस्यपदासाठी गोविंद गावकर हे फडके पॅनलचे उमेदवार असतील. यावेळी 50 हून अधिक विविध क्लबांचे प्रतिनिधी तसेच बाळू फडके, मोहन चोडणकर, तुळशीदास शेटय़े आदी उपस्थित होते.
विरोधकांकडे सचिवपदाचा उमेदवारच नाहीः विपुल फडके
आमच्या पॅनलमधील विरोधकांकडे सध्या सचिवपदाचा उमेदरवारच नाही. सचिवपद हे जीसीएतील एक महत्वपूर्ण प्रशासकीय आणि जबाबदारीचे पद आहे. त्यामुळे विरोधकांकडे ही जबाबदारी घेणारा उमेदवारच नसल्याचे फडके म्हणाले. आपण हे पद माझ्या मागील कार्यकाळात भुषविले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या रोहन गावस देसाई यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून ते कोणत्या गटात आहे, ते स्पष्ट केले आहे. ज्यांच्याकडे सचिवपदाचा उमेदवार नाही ते कुठे वाटचाल करत आहेत, ते स्पष्ट होतयं, असे विपुल फडके म्हणाले. क्लबांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी आमच्या विरोधकांनी आमच्याच काही उमेदवारांची नावे आपल्या पॅनलमधून घातली आहे. मात्र मतदार प्रतिनिधी हुषार आहेत. त्यांच्या या ‘ट्रिक्स’ना ते बळी पडणार नाहीत, असे फडके म्हणाले.
मी विपुल फडके गटाचा : रोहन गावस देसाई
माझा फॉर्म मी खोर्ली इलेव्हनकडून निवडणूक अधिकाऱयांना दिला. मी आता म्हापसाच्या या क्लबचे प्रतिनिधीत्व करत आहे आणि हा क्लब विपुल फडकेंचा समर्थक क्लब आहे. त्यामुळे मी अन्य गटाला सामिल होऊच शकत नाही. मला सर्व क्लबांचा पाठिंबा आहे. ‘आता मी कुठल्या पॅनलच्या उमेदवारांसमवेत बसलोय, असा प्रतिसवाल रोहन देसाईने यावेळी केला. ‘ग्रासरूट क्रिकेट, क्लबांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची उभारणी हे माझ्या कारकिर्दीत मी आपल्या सहकाऱयांच्या मदतीने पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित सचिव रोहन गावस देसाई म्हणाले.
विकेंद्रीकरणावर आता जास्त भर देणार
बहुतेक क्रिकेट सामन्यांच्या आयोजन पर्वरी मुख्यालयाच्या मैदानावर होतात. आपलं पॅनल निवडून आले तर राज्याच्या विविध भागात क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येईल. जीसीएने आता पाच नवीन क्रिकेट मैदाने तयार केली आहेत. याव्यतिरिक्त विविध क्रेकेट प्रशिक्षण सेंटरही तयार केली असून ती विविध भागात कार्यान्वितही झाली आहे. आपलं पॅनल निवडून आलं तर आणखी प्रशिक्षण केंद्रांची त्यात भर पडणार असल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार विपुल फडके म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्टेडियमची निर्मिती ही आमच्या प्रमुख रडारावर आहे, हे परत एकदा फडकेंनी स्पष्ट केले. बीसीसीआयचा आम्हाला आर्थिक पाठिंबा मिळत आहे. निवासी क्रिकेट अकादमीलाही आम्ही प्राधान्य देणार असल्याचे फडके म्हणाले.
जीसीएत आर्थिक गैरव्यवहार काहीच नाही
सूरज लोटलीकर यांच्या अध्यक्षपदाखालील मंडळाचा कारभार जबाबदारीने आणि पारदर्शकतेने झाला आहे. जीसीएत सूरज लोटलीकरने पूर्ण पारदर्शकता आणली याकडे विपुल फडके यांनी लक्ष वेधले. आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर सक्तीची स्वाक्षरी असलेल्या खजिनदार परेश फडते यांनी त्याच वेळी सही करताना आक्षेप का घेतला नाही, असा सवालही यावेळी विपुल फडके यांनी परत केला. विरोध करायला पाहिजे म्हणून करू नका, असा सल्लाही यावेळी त्यांनी आपल्या विरोधकांना दिला.
सर्व स्पर्धा झाल्या यशस्वी
आपल्या सचिवपदाच्या कारकिर्दीत आपण सर्व जीसीएच्या स्पर्धा निर्विघ्नपणे पूर्ण केल्या. क्रिकेट सर्व क्षेत्रात नेण्याचा प्रयत्न केला. केवळ सहा सामने मॅटिंग विकेट्सवर तर उर्वरीत सर्व सामने टर्फवर खेळविले व हे सर्व क्लब्स, अंपायर्स तसेच क्रिकेट खेळाच्या संबंधितांच्या सहकार्याने पूर्ण केले, असे विपुल फडके म्हणाले. आपल्या तीन वर्षांच्या क्रिकेटच्या यशोगतीचा रिपोर्ट सर्व क्लबांच्या प्रतिनिधींसमोर आहे. आम्ही जेव्हा क्लबांना सामोरे गेलो तेव्हा सर्वांनी दिलेला पाठिंबा निश्चितच सुखावह होता व त्याची पावती आम्हाला 27 ऑक्टोबर रोजी मिळणार असल्याचे फडके म्हणाले. गोवा क्रिकेट संघटनेचे नाव सूरज लोटलीकरने पुन्हा एकदा नावारूपास आणलं आहे. आमच्या पॅनलला सुद्धा सूरज लोटलीकर यांचा पाठिंबा असून त्यांच्या मार्गदर्शनही यापुढे आमच्यासाठी मोलाचं असेल, असे विपुल फडके म्हणाले.
क्रिकेटपटूंची बेंचस्ट्रँग्थ वाढविण्यासाठी देणार जीसीए भर
सीनियर स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत परराज्यातील क्रिकेटपटूंबाबत बोलताना राज्यात क्रिकेटपटूंची बेंचस्ट्रँग्थ नसल्याने या खेळाडूंवर अवलंबवून राहावे लागते विपुल फडके यांनी मान्य केले. भविष्यात आम्ही सुरू केलेल्या प्रशिक्षण केंद्राद्वारे कुमार तसेच युवा क्रिकेटपटू तयार होतील असे सांगून जीसीएच्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्येही बदल करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू व यासाठी आम्ही कॉर्पोरेट्सचीही मदत घेऊ, असे शेवटी विपुल फडके म्हणाले.