पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची माहिती : परस्पर मार्गास कायम समांतर मार्ग घोषित
कोल्हापूर प्रतिनिधी
गणेश विसर्जन मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग सुरु आहे. पण पर्यायी मार्गही केला असून या मार्गावरुन जाण्यासाठी 80 मंडळांनी होकार दर्शवला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक आणि पर्यायी मार्गासंदर्भात चार दिवसापासून चर्चा सुरु आहे. याबाबत बुधवारी पुन्हा पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पत्रकारांना महिती दिली. ते म्हणाले, मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबर सकारात्मक बैठक झाली. यामध्ये पर्यायी मार्गावरुन विसर्जन मिरवणूक काढण्यास 80 मंडळांनी होकार दिला आहे. पर्यायी मार्गामुळे महाद्वार रोडवर गर्दी न होता चेंगराचेंगरीची घटना घडणार नाही. पोलीस काठी उगारायची वेळ येऊ देणार नाहीत. पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागातून लोक मोठय़ा संख्येने येतात. त्यावेळी चोरीच्या घटना होऊ नयेत यासाठी एलसीबी, डी. बी. पथके आणि गस्ती पथके ग्रामीण भागात गस्त घालणार आहेत. महिला, मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून निर्भया पथके आहेत.
बिनखांबी ते पापाची तिकटीपर्यंत तासाची अट
मिरजकर तिकटी आणि बिनखांबी गणेश मंदिर येथून मुख्य विसर्जन मिरवणूकीत प्रवेश झाल्यानंतर गणेश मंडळांनी बिनखांबी ते पापाची तिकटी हे अंतर एक तासात पूर्ण करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
उमा टॉकीज ते पापाची तिकटी समांतर मार्ग
मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गाला परस्पर समांतर मार्ग आहे. उमा टॉकीज- बिंदू चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-पापाची तिकटी असा हा मार्ग आहे. या मार्गाचा मंडळांनी अवलंब करावा. या मार्गावरही बूथ उभारुन गणेश मंडळांचे स्वागत करावे.
लेसर लाईटवर कारवाईची मंडळांची मागणी
लेसर लाईटमुळे डोळयावर परिणाम होतो. मोबाईलचे नुकसान होते. यामुळे अनेक मंडळांनी लेसर लाईट लावणाऱयांवर कारवाईची मागणी केली आहे. यासाठी दक्षता समिती नेमण्यात आली आहे.
आवाजाची मर्यादा ठेवून सामाजिक भान राखावे
मोठया आवाजातील साऊंड सिस्टमचा रुग्ण, वृध्द यांच्यावर परिणाम होतो. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यांनाही त्रास होतो. यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूकीत आवाजाची मर्यादा ठेवून सामाजिक भान राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
महाद्वार रोडवर सहा ठिकाणी रुग्णवाहिका
मिरवणूकी दरम्यान एखादी घटना घडल्यास तत्काळ प्रतिसाद मिळाला पाहिजे. यासाठी महाद्वार रोडवर सहा ठिकाणी 108 रुग्णवाहिकांची सोय केली आहे. महापालिका प्रशासनासोबत वैद्यकीय पथके आहेत.
मिरवणूकीतील पोलीस बंदोबस्त
पोलीस अधिकारी/कर्मचारी- 2500
होमगार्ड -1700
एसआरपीएफ- एक कंपनी
बाहेरील जिल्हय़ातून -100 अतिरिक्त पोलीस कर्मचारी
मिरवणूक मार्गावर 200 सीसीटीव्ही
वीज खंडित झाल्यास मिरवणूक मार्गावर पोलीसाकडून जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा
वाहनांचे मेकॅनिकल सर्टिफिकेट आवश्यक
मिरवणूकीतील ट्रक्टर सुस्थितीत नसल्यास अडचण निर्माण होते. यामुळे वाहनांचे आरटीओकडून मेकनिकल सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. पोलीस वाहनांची तपासणी करुन सर्टिफिकेट पाहणार आहेत. चालकांने मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये. जाणीवपूर्वक वाद निर्माण करणाऱया मंडळांना मिरवणूक मार्गात लवकर प्रवेश दिला जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी स्पष्ट केले.