कोरोना संकटामुळे ‘उमेद’तर्फे योजना : सावंतवाडीत साडेतीन टन बियाणे वितरित
प्रतिनिधी / सावंतवाडी:
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सावंतवाडी कार्यालयाच्या पुढाकाराने सावंतवाडी तालुक्यातील महिला गटाच्या समूहांना बांधावर साडेतीन टन बियाणे वितरित करण्यात आले
सध्या जगभर कोरोना विषाणूमुळे सर्वजण हैराण आहेत. सर्व व्यवहार काही
प्रमाणात बंद आहेत. मात्र, शेतकरी राजा कोविड-19 ला घाबरत-घाबरत आगामी खरीप हंगामासाठी आंतरमशागत करून आर्थिक जुळवाजुळव करून खते व बी बियाणे खरेदीसाठी सज्ज झाला आहे. उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे आगामी काळात शेतकऱयाला बी बियाणे व खतांची टंचाई भासू नये, यासाठी शेतकरी गटामार्फत बांधावर बियाणे वितरण योजना आखली होती. ऐन रब्बी हंगामात ’कोरोना’ साथ आल्याने रब्बी हंगामातील काढलेले उत्पादन घरात पडून आहे. सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये व विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी शेतकरी गटामार्फत बांधावर बियाणे वाटप या योजनेच्या माध्यमातून शेतकऱयांची सोय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रयत्नशील आहे.
सावंतवाडी तालुक्यात 84 गावे आहेत. या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सावंतवाडी यांच्यामार्फत 1658 स्वसहाय्यता महिला गट बनविले आहेत. या गटांशी 17 हजार महिला जोडल्या आहेत. त्यापैकी आठ ते दहा हजार महिला शेती करतात. त्यामुळे सावंतवाडी कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचा समन्वय साधून बांधावर बियाणे वितरण योजना राबविण्यात आली.
शेतकरी गटामार्फत खरेदीचे आवाहन
ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्व प्रभाग समन्वयकांनी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, सिंधुदुर्ग व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात जाऊन बैठका घेतल्या. काही माहिती फोनवरून घेत सावंतवाडी तालुक्यातून भात बियाण्यांची एकूण 5.5 टनाची मागणीची यादी गोळा केली. नंतर ही यादी परब ऍग्रो सर्व्हिसेस कुडाळ आणि काजवा शेतकरी सेवा केंद्र, पणदूर यांना सादर केली. त्यांच्यात समन्वयक साधून या यादीनुसार या कृषी सेवा केंद्रामधून एकूण 3.5 टनाची बियाणे मिळाली. ही बियाणे बाजारभावात न देता घाऊक किमतीत व उत्तम दर्जाची बियाणे शेतकरी गटाला उपलब्ध करून देण्यात आली. गावातील शेतकऱयांनी शेतकरी गटामार्फत यापुढे खते व बियाणे एकत्र खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापक शिवराम परब, तालुका व्यवस्थापक-सेंद्रीय शेती व शेतकऱयांसाठी स्वत: विविध उपक्रम राबवणारे प्रदीप ठाकरे आणि सावंतवाडी तालुक्यातील सर्व तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांच्या प्रयत्नांनी बांधावर बियाणे वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. 400 किलो हळदीचे वाटप करण्यात आले.