Tarun Bharat

रिंगरोडविरोधात 823 हरकतींची नोंद

शेवटच्या दिवशीही शेतकऱयांनी नोंदविल्या हरकती : कडोली-शिंदोळी येथील शेतकऱयांनी प्रशासन विरोधात थोपटले दंड

प्रतिनिधी /बेळगाव

सुपीक जमिनीतून रिंगरोड तयार करण्याचा घाट घालण्यात आला. त्यामुळे शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याविरोधात शुक्रवारी हरकती नोंदविण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मोठय़ा संख्येने शेतकऱयांनी आपल्या हरकती नोंदविल्या. या रस्त्याला विरोध करण्यासाठी 823 जणांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत.

शुक्रवारी तालुका म. ए. समितीच्यावतीनेही काही शेतकऱयांच्या हरकती दाखल करण्यात आल्या आहेत तर काही शेतकऱयांनी स्वतंत्रपणे आपल्या हरकती नोंदविल्या आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण केले तर रिंगरोडची काहीच आवश्यकता नाही. शहरातूनच फ्लायओव्हर तसेच शहराच्या बाहेरदेखील फ्लायओव्हरची उभारणी केली तर शेतकऱयांच्या जमिनी वाचू शकतात. मात्र शेतकऱयांबद्दल आपुलकी नसलेल्या केंद्र सरकारने बेळगाव शहराच्या चारही बाजूंनी रिंगरोड करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याबाबत नोटिफिकेशन जारी केले. 21 दिवसांपूर्वी नोटिफिकेशन जारी झाले होते. शेतकऱयांना तातडीने हरकती नोंदविण्याचे आवाहन या नोटिफिकेशनद्वारे करण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱयांनी बहुसंख्येने आपल्या हरकती नोंदविल्या आहेत.

प्रांताधिकाऱयांकडून नोटिफिकेशन

दोन वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. मात्र त्याविरोधात शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा बेळगावच्या प्रांताधिकाऱयांनी या रस्त्यासाठी नोटिफिकेशन दिले आहे. त्यामुळे शेतकऱयांनी आता हरकती नोंदविल्या आहेत. शिवबसवनगर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात शेतकऱयांनी हरकती नोंदविल्या.

ऍड. एम. जी. पाटील, ऍड. शाम पाटील, ऍड. सुधीर चव्हाण आणि ऍड. महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या हरकती देण्यात आल्या आहेत. यावेळी मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कडोली-शिंदोळीतील शेतकऱयांच्या हरकती दाखल

रिंगरोडविरोधात कडोली, शिंदोळी या गावातील शेतकऱयांनी शेवटच्या दिवशी हरकती दिल्या. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असा निर्धार शिंदोळी व कडोली गावातील शेतकऱयांनी करून सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. ऍड. ए. एम. पाटील, ऍड. अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली या हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

अनेक शेतकरी होणार भूमिहीन

कडोली परिसरातील तिबारपिकी जमीन रिंगरोडसाठी घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. याचबरोबर शिंदोळी भागातीलही जमीन घेतली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेतकऱयांनी हरकती दाखल केल्या.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात जाऊन हरकती दिल्या आहेत. यावेळी विलास चौगुले, मारुती कणबर्गी, अर्जुन चौगुले, विजय रुटकुटे, दस्तगिर पठाण, पुंडलिक चौगुले, रेणुका मिरजकर, सुभाष पाटील, वसंत कुटे, शिवाजी कुटे, मारुती कणबर्गी, रमेश कणबर्गी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

बी. आय. पाटील यांना वाघवडे येथे श्रद्धांजली

Omkar B

गाळय़ांची सुनावणी 28 पर्यंत लांबणीवर

Amit Kulkarni

भाजप कोअरकमिटीची बैठक आज

Patil_p

वैशाली कुलकर्णी यांना पीएचडी

Patil_p

बुधवारी 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

सहय़ाद्री सोसायटी अध्यक्षपदी निवड झाल्याने पी. पी. बेळगावकरांचा सत्कार

Omkar B