100 वर्षीय वृद्धाकडून विक्रम
वयाच्या 15 व्या वर्षी सुरू केली होती नोकरी
तुम्ही कुठल्याही कंपनीत किती दिवसांपर्यंत काम करू शकता? 5 वर्षे? 10 वर्षे? आताची तरुण पिढी वेगाने नोकऱया बदलत असताना 100 वर्षीय एका वृद्धाने जगात सर्वाधिक काळापर्यंत एकाच कंपनीसाठी काम करण्याचा विक्रम नोंदविला आहे. 84 वर्षांपर्यंत एकाच कंपनीत काम करून ब्राझीलचे वाल्टर ऑर्थमन यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे.
ऑर्थमन यांचा जन्म 19 एप्रिल 1922 रोजी ब्राझीलच्या ब्रस्क या भागात झाला होता. वाल्टर शिक्षणात प्रारंभीपासूनच हुशार होते. कुशाग्रबुद्धीचे वाल्टर कुठलेही काम एकाग्रतेने करत होते. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
1938 पासून नोकरीवर
17 जानेवारी 1938 रोजी वाल्टर हे इंडस्ट्रियास रेनोक्स या टेक्सटाइल कंपनीत नोकरीला लागले. आता या कंपनीला रेनॉक्स ह्यू या नावाने ओळखले जाते. लवकरच त्यांना बढती मिळाली आणि ते विक्री व्यवस्थापक झाले. तेव्हापासून ते कंपनीत या पदावर आहेत. मागील 84 वर्षांपासून ते कंपनीत काम करत आहेत.
हा माझ्यासाठी अत्यंत गर्वाचा क्षण आहे. मी नेहमीच वर्तमानाबद्दल विचार केला, याचमुळे इतिहास रचू शकलो. भविष्याबद्दल अधिक विचार करून मी नियोजन करण्यात वेळ खर्ची घालत नाही. उद्याचा दिवस नवा असेल एवढाच मी विचार करतो असे वाल्टर यांनी म्हटले आहे. अलिकडेच त्यांनी स्वतःचा 100 वा वाढदिवस स्वतःचे मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱयांसोबत साजरा केला आहे.