वृत्तसंस्था / मास्को
अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून माघारी जात असताना तालिबानने या देशाचे विविध भाग ताब्यात घेण्याचा सपाटा लावल्याचा दावा केला आहे. गेल्या महिन्याभरात 85 टक्के अफगाणिस्तानवर आपले नियंत्रण प्रस्थापित झाल्याचा दावाही तालिबानने केला आहे. मात्र अफगाणिस्तान सरकारने तो खोडला आहे.
अमेरिकेची सेना अफगाणिस्तानातून 31 ऑगस्टपर्यंत पूर्णतः माघारी जाणार आहे. त्यानंतर या देशात अराजक माजणार असल्याचा इशारा अनेक जाणकारांनी दिला आहे. अमेरिकेचे सैन्य परतल्यानंतर अफगाणिस्तानातील विविध दहशतवादी टोळ्या सक्रिय होतील आणि प्रचंड प्रमाणात हिंसाचार सुरु होईल, अशी भिती व्यक्त होत आहे. तालिबानच्या हातात सत्ता गेल्यास कोणती परिस्थिती ओढवेल याचा अंदाज आताच करता येणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.
महिलांचा तालिबानला विरोध
तालिबानचे वर्चस्व रोखण्यासाठी येथील महिला पुढे सरसावल्या असून त्यांनी शस्त्रसज्ज महिलांची गट तयार करण्यास प्रारंभ केला आहे, असे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थांनी दिले आहे. राजधानी काबुल मध्ये महिला मोठय़ा संख्येने शस्त्र चालविण्याचा सराव करताना दिसून येत आहेत, असेही वृत्त आहे.