खरेदी केली पहिली कार, वेळ कधीच निघून गेलेली नसते
वय केवळ एक आकडा आहे. हा आकडा पाहून विचार करणारे लोक काय करावे, कधी करावे, आता वय निघून गेल्याचे म्हणत असतात. असा विचार करणारे लोक नेहमीच हातावर हात ठेवून बसून राहतात. तरुणाईमध्ये उत्साह असतो आणि वृद्धत्वात हा उत्साह आणि निर्धार संपून जात असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. ज्याला काहीतरी साध्य करायचे आहे, तो वयाबद्दल विचार करत नाही, केवळ काम करण्याचा विचार करून ते मनापासून करतो. स्वप्न पूर्ण करण्यास कधीच उशीर होत नसतो.
गुजरातमधील एका वृद्धाने अचंबित करणारी कामगिरी करून दाखविली आहे. त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करत त्यात यश मिळविले ओ. या व्यक्तीचे नाव राधाकृष्ण चौधरी आहे. प्रेम आणि आदराने लोक त्यांना नानाजी अशी हाक मारतात. वयाच्या या टप्प्यात चौधरी यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी स्वतःचा पहिला कारखाना सुरू केला आणि काहीही नवे करण्यास कधीच उशीर झालेला नसतो हे जगाला दाखवून दिले आहे.
इन्स्टाग्रामवर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. याच्या कॅप्नशमध्ये कशाप्रकारे वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी स्वतःचा पहिला कारखाना सुरू केला हे नमूद आहे. हा एका आयुर्वेदिक कंपनीचा कारखाना आहे. राधाकृष्ण चौधरी या व्हिडिओत नव्या कारसह दिसून येतात. त्यांच्या कंपनीचे नाव अविम हर्बल असून ही पोस्ट त्यांच्या कंपनीच्या इन्स्टाग्राम अकौंटवरून शेअर करण्यात आली आहे.
असे मिळाले यश
या कंपनीची सुरुवात त्यांनी सुमारे 6 महिन्यांपूर्वी केली होती. इतक्या कमी वेळेत त्यांच्या कंपनीने लोकांची मने जिंकली आहेत. यशस्वी होण्यासाठी व्हिजन अन् मिशन होते, विश्वास होता, अथक परिश्रम आणि सांघिक कार्य हाहेते असे चौधरी यांनी म्हटले आहे.