नेत्रहीन व्यक्तींना दाखविणार मार्ग
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दरदिनी नवनवे आविष्कार होत असतात. यातील अनेक उत्पादने ही अत्यंत उपयुक्त ठरतात. लोकांच्या मदतीसाठी अनेक उपकरणे डिझाइन केली जातात, एक असेच उत्पादन 9 वीत शिकणाऱया विद्यार्थ्याने तयार केले आहे. कमी वयात या विद्यार्थ्याने तयार केलेल्या या डिझाइनमुळे नेत्रहीनांना मोठा लाभ होऊ शकतो.
आसाममधील अंकुरित करमाकरने एक स्मार्ट शूज तयार केला असून तो नेत्रहीन लोकांना मदत करणार आहे. अंकुरित आसामच्या करिमगंजमध्ये राहत असून इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. त्याने सेंसर आणि बज्जरने युक्त एक स्मार्ट शू (बूट) डिझाइन केला आहे. अंकुरितला हे उत्पादन तयार करण्याकरता शाळेची तसेच कुटुंबाची मदत मिळाली आहे.
अंकुरितने तयार केलेल्या स्मार्ट शूमध्ये सेंसर आणि बज्जर बसविण्यात आला आहे. एखादी वस्तू युजरच्या शूजसमोर आल्यास बज्जर वाजू लागतो. यामुळे नेत्रहीन व्यक्तीला स्वतःचा मार्ग बदलण्याची सूचना मिळू शकणार आहे.
हे स्मार्ट शूज वापरणाऱया व्यक्तीच्या वाटेत एखादा अडथळा आल्यास सेंसर त्याला डिटेक्ट करतो, त्यानंतर बज्जर युजरला अलर्ट करतो. बज्जर वाजू लागताच नेत्रहीन व्यक्ती त्याचा आवाज ऐकून सतर्क होईल आणि स्वतःचा मार्ग बदलून गोष्टींना धडकण्यापासून वाचणार असल्याचे अंकुरितने सांगितले आहे.
9 वीत शिकणाऱया अंकुरितला वैज्ञानिक व्हायचे आहे. लोकांना मदत करणारी आणि त्यांचे जीवन सुलभ करू शकतील अशी उपकरणे तयार करण्याची इच्छा आहे. स्मार्ट शू नेत्रहीन लोकांसाठी तयार केला असल्याचे अंकुरितने म्हटले आहे.