अमेरिकेच्या अध्यक्षांकडून आश्वासनाची पूर्तता
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी 9/11 हल्ल्यांशी संबंधित चौकशी दस्तऐवज सार्वजनिक करणाऱया कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हल्ल्यांनंतर एफबीआयने केलेल्या चौकशीशी संबंधित दस्तऐवज सार्वजनिक केले जातील असे आश्वासन या हल्ल्यांच्या पीडित कुटुंबांना दिले होते.
डीक्लासिफाइड करण्यात येणाऱया दस्तऐवजांची समीक्षा करण्याचा आदेश न्याय विभागाला दिला आहे. ऍटर्नी जनरल मॅरिक गारलँड या दस्तऐवजांची समीक्षा करतील आणि त्यानंतर 6 महिन्यांनी हे दस्तऐवज सार्वजनिक होणार आहेत.
दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. 11 सप्टेंबर रोजी या हल्ल्यांना 20 वर्षे पूर्ण होतील. 20 वर्षांनीच अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून परत आलेले असेल असे उद्गार बायडेन यांनी काढले आहेत.
या दस्तऐवजांमध्ये 9/11 हल्ल्यांच्या कटाशी संबंधित माहिती मिळणार आहे. याचबरोबर अशाप्रकारच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी अमेरिकेने कुठली तयारी केली हे देखील समजू शकणार आहे. देशाची सुरक्षा धोक्यात येईल अशाप्रकारचे दस्तऐवज सार्वजनिक करता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याचमुळे न्याय विभागाकडून या दस्तऐवजांची समीक्षा होणार आहे.