‘रंगीता एन्टरप्रायझ’चा म्होरक्या गुजरात राज्यातील
प्रतिनिधी /मडगाव
‘रंगीता एन्टरप्रायझेस’ या मडगाव येथे कार्यालय असलेल्या कंपनीने गोव्यासह इतर राजातील सुमारे 2 हजार ग्राहकांना सुमारे 16 कोटी रुपयांना गंडा घातेलेले प्रकरण गोवा पोलीस खात्याने नोंद केले आहे. गोव्यातील ग्राहकांना या आस्थापनाने 9.33 कोटी रुपयांना फसविलेले आहे.
आर्थिक गुन्हा विभागातील पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी हे प्रकरण नोंद करुन घेतले.
वडोदरा सीटी -गुजरात येथील गोहील जय कुमार, सध्या नावेली येथील व मूळ आगोंद येथील स्वीझल फर्नाडिस, मडगावातील मूईद माधवानी, बिर्ला वास्को येथील लमाजी लमाणी, पाजीफोंड- मडगाव येथील मैरीन माधवानी, वडोदरा सिटी गुजरात येथील आरती कैश्यप ही मंडळी या प्रकरणातील संशयित आरोपी आहेत.
या संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 406, 409, 420, 120 ब, तसेच गोवा प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्टस ऑफ डिपोझीटर्स (फायनान्शीयल इस्टाब्लीस) ऍक्ट 1999च्या 3, 5 कलमाखाली तसेच प्राईझ चिट ऍण्ड मनी सर्पुलेशन स्कीम (बॅनींग) ऍक्टच्या 4 व 5 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
15 जुलै 2021 ते 10 जून 2022 या 331 दिवसादरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपींनी गोव्यातील गुंतवणूकदारांकडून 9 कोटी 33 लाख रुपयांना गंडा घातल्याचे या प्रकरणी आर्थिक गुन्हा कक्षाने दिलेल्या माहितीत म्हटलेले आहे.
अशी केली फसवणूक
आठवडय़ाला 20 टक्के दराने व्याज देऊ असे आश्वासन मिळाल्यानंतर ज्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये गुंतविले त्याला एका महिन्यात 80 हजार रुपये ज्यादा मिळत. अवघ्या एक लाखाला महिन्याकाठी आणखी 80 हजार रुपये ज्यादा मिळत असल्याचे पाहून गोव्यातील अनेक गुंतवणूकदारांनी यात आपला कष्टाचा पैसा गुंतविला होता.
या कंपनीने अवघे 6 ते 7 महिन्यात आपला ‘धंदा’ केला होता आणि त्यानंतर या कंपनीने आपला गाशा गुंडाळला. सुरुवातीला व्याजाची रक्कम वेळोवेळी दिली. मात्र, सुमारे 7 महिन्यानंतर याह आस्थापनाने आपला रंग दाखवला. गोव्यातील गुंतवणूदार या प्रकरणातील संशयित आरोपी गोहील जय कुमार याच्याकडे 22 मे 2022 पासून संपर्कात होत.s मात्र त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.
16 कोटीचा गंडा
मुईद माधवानी हे या कंपनीच्या संपर्कात होते. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील गुंतणवूकदारांना या कंपनीने 9 कोटी 33 लाखांना तर देशाच्या उर्वरित भागातील गुंतवणुकदारांना घातलेला गंडा मिळून 16 कोटींच फसवणूक केलेली आहे अशी माहिती दिली आहे. या आस्थापनाचे वा या कंपनीचे एकूण सुमारे 2 हजार ग्राहक होते आणि फसवणुकीची झळ या सर्वाना बसलेली आहे.