कोरोना संसर्गावर व्हिएतनामची एकतर्फी मात
हनोई / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गामुळे पूर्ण जग त्रस्त असताना चीनच्या सीमेला लागून असलेल्या एका देशात या महामारीमुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. कोरोनाच्या तडाख्यातुन वाचल्याने व्हिएतनामची जगभरातून प्रशंसा होत आहे. व्हिएतनामची लोकसंख्या 9.7 कोटींच्या आसपास असूनही शनिवारपर्यंत तेथे केवळ 328 कोरोनाबाधित सापडले आहेत. व्हिएतनाममध्ये बहुतांश लोक कनिष्ठ उत्पन्न गटातील आहेत. तर तेथील आरोग्यसेवाही अमेरिका, दक्षिण कोरिया समवेत अनेक देशांच्या तुलनेत मागास आहे. जागतिक बँकेनुसार व्हिएतनाममध्ये 10 हजार लोकांमागे केवळ 8 डॉक्टर्स आहेत. तर दक्षिण कोरियात हेच प्रमाण 24 इतके आहे.
अत्यंत दक्ष सरकार
व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूसंबंधी प्रारंभीपासूनच जागरुकता राहिली आहे. सरकारने चीनला लागून असलेली सीमा आणि लोकांची परस्परांच्या देशात सुरू असलेली ये-जा पाहता 3 आठवडय़ांचा कडकडीत लॉकडाउन जाहीर केला होता. परंतु एप्रिलच्या अखेरीस तेथील स्थितीचा आढावा घेतल्यावर लॉकडाउन हटविण्यात आला होता. त्यानंतर 40 दिवसांपर्यंत एकही स्थानिक बाधित सापडलेला नाही. व्हिएतनाममध्ये आता शाळा पुन्हा सुरू केल्या जात असून जनजीवत पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होत आहे.
चीनसोबतची सीमा बंद
कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडताच व्हिएतनामने महामारीच्या फैलावाचा अंदाज घेत चीनला लागून असलेल्या स्वतःच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यावेळी चीनच्या अधिकाऱयांनी तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाचा संसर्ग मानवातून मानवात पसरल्याची पुष्टी देखील दिली नव्हती. परंतु व्हिएतनामने कुठलीच जोखीम न पत्करता स्वतःची तयारी सुरूच ठेवली.
योग्यवेळेत तयारी सुरू
जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशांची प्रतीक्षा न करता स्वतःच्या आरोग्य संबंधी लोकांना जागरुक करण्यास सुरुवात करण्यात आली. जानेवारीच्या प्रारंभीच हर्नेई विमानतळावर वुहानमधून येणाऱया प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आले. तापमान अधिक दिसून आलेल्या लोकांना 14 दिवसांसाठी अनिवार्य क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती हनोईतील स्वच्छता आणि महामारी विभागाच्या प्रमुखांनी दिली आहे.
चीनशी तोडला संपर्क
व्हिएतनाममध्ये पहिला रुग्ण 23 जानेवारी रोजी सापडला होता, त्यानंतर सरकारने सर्व विमानोड्डाणे रद्द केली होती. लूनर न्यू ईयरवेळी व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी कोरोना विषाणूच्या विरोधातील लढय़ाची घोषणा केली. देशाचे सर्व सीमा तपासणी नाके, विमानतळ आणि बंदरावर थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आले. पंतप्रधानांनी संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक राष्ट्रीय कार्यकारी समिती स्थापन केली.
विदेशी नागरिकांना मज्जाव
1 फेब्रुवारी रोजी व्हिएतनामने कोरोना विषाणूला राष्ट्रीय महामारी घोषित केले. तेव्हापासून चीनमधून येणाऱया सर्व विमानोड्डाणांवर बंदी घालण्यात आली. व्हिएतनाममध्ये तोपर्यंत केवळ 6 रुग्ण आढळून आले होते. 2 फेब्रुवारी रोजी चिनी नागरिकांचा व्हिसा रद्दबातल ठरविण्यात आला. व्हिएतनामध्ये मार्चच्या अखेरीस सर्व विदेशींच्या प्रवेशावर बंदी घातली.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर
गरीब देश असूनही व्हिएतनामने कोरोना संसर्गाच्या चाचणीसाठी स्वस्त कीट विकसित केले. बाधितांच्या संपर्कातील सर्वांची चाचणी करण्यात आली. लोकांना 14 दिवसांपर्यंत अनिवार्य क्वारंटाईन करण्यात आले.
सामाजिक जागरुकता
देशाकडे सर्व साधनसामग्री उपलब्ध नसल्याने मोठय़ा संख्येतील बाधितांवर उपचार करणे शक्य नसल्याचे व्हिएतनामचे सरकार ओळखून होते. याच कारणामुळे सरकारने व्यापक प्रमाणावर जागरुकता मोहीम राबविली. समाजमाध्यम, फलकांच्या माध्यमातून लोकांना विषाणूसंबंधी माहिती देण्यात आली.