श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील गांदरबल जिह्यात कॅब वाहन खोल दरीत कोसळल्याने एका लष्करी जवानासह नऊ जण ठार झाल्याचे पोलीस अधिकाऱयांनी गुरुवारी येथे सांगितले. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर झोजिला येथे कारगीलहून श्रीनगरकडे निघालेली कॅब एका नागमोडी वळणावर घसरल्यानंतर दरीत कोसळली. या दुर्घटनेनंतर पोलीस, लष्कर आणि स्थानिकांनी शोधकार्य आणि बचावमोहीम सुरू केली. याप्रसंगी चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतांमध्ये कुलगामस्थित नायब सुभेदार नानक चंद या लष्करी अधिकाऱयाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. तर, उर्वरित पाच जणांना गंभीर जखमी अवस्थेत दरीबाहेर काढण्यात आले. तथापि, जखमींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 9 वर पोहोचला. मृतांमध्ये पूंछमधील चालक अझहर इकबाल याच्यासह गुजरात, झारखंड, छत्तिसगड येथील रहिवाशांचा समावेश आहे. झारखंडचे रहिवासी, रणजीत कुमार, पंजाबचे रहिवासी, मुहम्मद अस्लम परे, अशी मृतांची नावे आहेत.