आयएसआयकडून घुसखोरी घडवून आणण्याचा कट ः 55 दहशतवादी लाँचिंग पॅडवर
वृत्तसंस्था / जम्मू
मोठय़ा संख्येत दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने 9 लाँचिंग पॅड तयार केले आहेत. या लाँचिंग पॅडवर 55 हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. तर घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी बीएसएफ अन् सैन्याने गस्त वाढविली आहे. तर घुसखोरीचे सर्व मार्ग बंद होत असल्याचे पाहून दहशतवादी आता नव्या मार्गांनी जम्मू-काश्मीरमध्ये शिरू पाहण्याचा कट रचत असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
हिवाळय़ापूर्वी सुमारे 150 दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचा आयएसआयचा कट आहे. हिमवृष्टीनंतर घुसखोरीच्या वाटा बंद होत असतात. तर सध्याच्या पावसाळय़ात घुसखोरी घडवून आणण्याचा प्रयत्न आयएसआयकडून केला जात आहे.
पाकिस्तानकडून उत्तर काश्मीर, पुंछ आणि नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचा कट आहे. सुरक्षा यंत्रणांच्या इनपूटनुसार सध्या सीमेपलिकडे 150 दहशतवाद्यांना घातपाताचे प्रशिक्षण देण्यात आले असून ते पुढील आदेशाची प्रतीक्षा करत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चालविले जाणारे हे दहशतवादी तळ सीमेपासून 4-5 किलोमीटर अंतरावर आहेत. लाँचिंग पॅड सीमेला लागून असलेल्या गावांमध्sय हलविण्यात आले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या वेशातील दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी तयार ठेवण्यात आले आहे.
दहशतवाद्यांना लाँचिंग पॅडवर 2-3 दिवसांपर्यंत ठेवले जात होते, परंतु भारतीय सैन्याच्या मजबूत ग्रिडमुळे आता हे दहशतवादी अनेक दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर बसून आहेत. सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये लोकांच्या घरातच लाँचिंग पॅड तयार करण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी या घरांमध्ये दहशतवाद्यांसोबत बैठका घेत आहेत.
कुठे-कुठे आहेत लाँचिंग पॅड?
बालाकोट, गढी हबीबउल्लाह, दुलैई, सनसा, कोटलीर, खुरैटा, गुलपूर, समानी, तत्तापानी.