अद्याप कायम आहे रहस्य
दक्षिण अमेरिकेपासून सुमारे 3700 किलोमीटर अंतरावर ईस्टर आयलँड आहे. या बेटावर ज्वालामुखीय दगडांमध्ये कोरीव काम करून तयार करण्यात आलेल्या मूर्ती आहेत. सरासरी 13 फूट उंच अन् 14 टन वजनी दगडांमध्ये शिल्पकला करत या बेटाच्या चहुबाजूने त्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यांना ‘मोई’ म्हटले जाते आणि यांची संख्या जवळपास 900 इतकी आहे. जगातील अनेक रहस्यमय ठिकाणांमध्ये ईस्टर आयलँडचा समावेश आहे. या मूर्ती कशाप्रकारे तयार करण्यात आल्या आणि त्यामागील उद्देश काय हे आज देखील रहस्यच आहे.
ईस्टर आयलँडच्या प्राचीन लोकांनी शासक वर्गाच्या सूचनेनुसार 1000 मोई तयार करण्याचे काम केल्याचे मानले जाते. या सर्व मूर्ती एकसारख्याच आहेत. बहुतांश मूर्तींमध्ये चेहरा असला तरी त्यांचे डोळे कोरण्यात आलेले नाहीत.
या मूर्ती कुठून आणल्या गेल्या हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे. काही लोक या मूर्ती परग्रहवासीयांनी आणून ठेवल्याचे मानतात. ईस्टर बेटाबद्दल 1722 मध्ये सर्वप्रथम कळाले होते, तेव्हा युरोपीय एक्सप्लोरर जॅकब रॉकडेविन येथे स्वतःच्या नौकेतून पोहोचला होता. तो ज्या दिवशी या बेटावर पोहोचला होता, तो ईस्टर संडे होता. याचमुळे या बेटाला ईस्टर हे नाव पडले.
अखेर या मूर्ती या ठिकाणी कशाप्रकारे आणल्या गेल्या याबद्दल सर्वाधिक चर्चा होत असते. या मूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला दगड एक विलुप्त ज्वालामुखीय दडग होता. या मूर्ती आणण्यासाठी त्या काळातील लोकांनी दोरखंडाचा वापर केला असावा असा युक्तिवाद करण्यात येतो.