लढणं थांबवू नका, कोरोनाला हरविणे शक्य
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे स्टीव्ह व्हाइट सर्वाधिक काळापर्यंत कोरोनाशी लढणारे सर्वाइवर (हयात) ठरले आहेत. 92 दिवसांनी स्टीव्ह रुग्णालयातून घरी परतले आहेत. नृत्यकलाकार असलेल्या स्टीव्ह यांना हियरफोर्ड काउंटी हॉस्पिटलमध्ये 19 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. दीर्घ उपचारानंतर त्यांना 18 जून रोजी डिस्चार्ज मिळाला आहे. स्टीव्ह यांच्या वाचण्याची शक्यता केवळ 1 टक्के होती. कुटुंबीयांनी स्टीव्ह यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची विनंती सातत्याने केली होती. कोरोनाशी लढल्यावर अखेरीस स्टीव्ह यांनी महामारीवर मात केली आहे.
काही तासच शिल्लक
56 वर्षीय स्टीव्ह यांना दोन मुले असून ब्रिटनमध्ये त्यांच्याच नावाची चर्चा होत आहे. कोरोनाशी लढणाऱया लोकांना माझे प्रकरण आशेचा किरण आहे. लढणं थांबवू नका एवढंच मी त्यांना सांगू शकतो असे स्टीव्ह म्हणाले. स्टीव्ह काही तासच जगतील असे एप्रिल महिन्यात डॉक्टरांनी सांगितले होते, त्यानंतर स्टीव्ह कोमात गेले होते.
67 दिवस अतिदक्षता विभागात
डॉक्टरांनी स्वतःचे प्रयत्न सुरूच ठेवले, मी स्वतःला त्यांच्या हवाली केले होते. कोरोना संसर्गातून बरे झाल्यावर हॉस्पिटलचा कर्मचारीवर्ग या घटनेला चमत्कार ठरवून मला ‘हिरो’ संबोधित होते. फिजियोथेरपी आणि चालण्याच्या सरावाने सर्वप्रथम 67 दिवस केवळ अतिदक्षता विभागातच घालविले. कोरोनाशी लढणाऱया दोन तृतीयांश रुग्णांचा व्हेंटिलेटरवरच मृत्यू होतो, परंतु मी दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर राहूनही खऱया आयुष्यात परतल्याचे स्टीव्ह म्हणाले.
कोमातून बाहेर आलो
व्हेंटिलेटरवर 43 दिवस राहिल्यावर कोमामध्ये गेलो होता. शुद्ध आल्यावर आलेला अनुभव अत्यंत घाबरविणार होता, मला काहीच आठवत नव्हते. गळय़ात ट्रकियोस्टॉमीमुळे (गळय़ाला छिद्र पाडून प्राणवायू पुरविणे) आवाजच निघत नव्हता. डॉक्टर आणि परिचारिका मला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या असे स्टीव्ह म्हणाले.
1 टक्केच शक्यता
दिवस निघून जात असताना स्टीव्ह यांच्या वाचण्याची शक्यताही मावळत होती. स्टीव्ह वाचण्याची शक्यता केवळ 1 टक्के असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. परंतु आम्ही त्यांना जाऊ देऊ इच्छित नव्हतो असे त्यांचे पुत्र कॅलम यांनी म्हटले आहे.