ब्रिटनकडून कोव्हॅक्सिन संमत, देशातील रुग्णसंख्येत आणखी घट
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात दिल्या जाणाऱया कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता देण्यास जगातील 96 देशांनी सहमती दर्शविली आहे. तसेच ब्रिटनने संपूर्ण भारतनिर्मित कोव्हॅक्सिन या लसीला मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
इतर देशांशी भारत सरकार सातत्याने संपर्कात आहे. भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला साऱया जगाकडून मान्यता मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारताने जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम हाती घेतला असून त्याचे जगभरात कौतुक होत आहे. भारताच्या लसींना जगात मान्यता मिळत असल्याने आता भारतीय लोक जगात कोठेही शिक्षण, पर्यटन, व्यवसाय किंवा काम यासाठी जाण्यास पात्र झाले आहेत. नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीला तातडीच्या उपयोगासाठी मान्यता दिली आहे. हे भारताचे मोठेच यश आहे, असेही प्रतिपादन मांडविया यांनी केले.
महत्वाच्या देशांचा समावेश
भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता देणाऱया देशांमध्ये कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, आयर्लंड, हॉलंड, स्पेन, बांगलादेश, माली, घाना, सिएरा लोने, अंगोला, नायजेरिया, बेनिन, छाड, हंगेरी, सर्बिया, स्लोव्हाक रिपब्लिक, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बुल्गारिया, तुर्कस्थान, ग्रीस, फिनलंड, इस्टोनिया, रोमानिया, मोल्डोव्हा, अल्बानिया, झेक रिपब्लिक, स्विट्झर्लंड, लीचेस्टेनिन, स्वीडन, ऑस्ट्रिया, मोंटेनेग्रो, आईसलंड, एस्वाटीनी, रवांडा, झिम्बाब्वे, युगांडा, मालावी, बोस्टवाना, नामिबिया, किरगिस्तान, बेलारुस, अर्मेनिया इत्यादी देशांचा समावेश आहे.
याशिवाय, मेक्सिको, पनामा, अर्जेंटिना, ब्राझील, युरुग्वे, कोलंबिया, ग्वाटेमाला, होंडुरास, हैती, नेपाळ, इराण, पेलेस्टाईन, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, जपान, सिरीया, दक्षिण सुदान, त्रिनिदाद अँड टोबॅगो, अल्साल्वादोर, पेरु, जमेका, बहामाज, कतार, बहारिन, कोमोरोस, मॉरिशस इत्यादी देशांनीही मान्यता दिली आहे.
उपचाराधीन रुग्णसंख्येत घट
सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये भारतात नवे 10,126 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून ही संख्या आता 1,40,638 वर पोहचली आहे. हा गेल्या 263 दिवसांमधील नीचांक आहे. बरे होण्याचे प्रमाण आता 98.25 टक्के इतके असून एकंदर मृत्यूंची संख्या 4,61,389 इतकी आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी प्रमाण 1.25 टक्के असून गेले सलग 46 दिवस ते 2 टक्क्यांखाली राहिले आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी प्रमाण 0.93 टक्के इतके आहे. या चोवीस तासांच्या काळात एकंदर 10,85,848 परीक्षणे करण्यात आली आहेत.