महिला-बाल रुग्णालयाकरिता शासनाचा निर्णय : वैद्यकीय अधीक्षक राहणार कार्यालय प्रमुख : एक कोटी खर्चाच्या अंतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाकरिता शासनाने एका निर्णयाद्वारे 97 अधिकारी व कर्मचारी पदे निर्माण केली आहेत, तर रुग्णालयाचे कार्यालयीन कामकाज व आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक वर्ग-1 यांना कार्यालय प्रमुख म्हणून शासनाने 18 ऑगस्ट रोजी एका आदेशान्वये घोषित केले आहे. त्यांनाच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
रुग्णालयाचे कामकाज लवकर सुरू करण्यासाठी एक कोटी रु. खर्चाच्या अंतर्गत कामांना एका शासन निर्णयाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.
महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव प्रदीप बलकवडे यांनी 18 ऑगस्ट रोजी याबाबतचा आदेश काढला आहे. जिल्हा महिला व बाल रुग्णालय (सिंधुदुर्ग-कुडाळ) या रुग्णालयाकरिता शासन निर्णयान्वये 97 अधिकारी व कर्मचाऱयांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. ते कामकाज व आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक वर्ग-1 यांना कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नियम क्र. 156 मधील तरतुदीनुसार वैद्यकीय अधीक्षक वर्ग-1 यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित केल्याचे स्पष्ट केले आहे.
अंतर्गत कामासाठी एक कोटी निधी
महिला व बाल रुग्णालयात कामकाज सुरू करण्यासाठी अंतर्गत कामे, पाणी पुरवठा, जोडरस्ता व अन्य कामांसाठी एक कोटी रु. च्या कामांच्या अंदाजपत्रकास शासन निर्णयाने मंजुरी देण्यात आली आहे.
रुग्णालय रंगकाम 15 लाख 77 हजार रु. बाहय़ पाणी पुरवठा 6 लाख 90 हजार रु., प्लॉट लेवल व जोडरस्ता 7 लाख 7 हजार रु., पार्टिशन, दरवाजा, किचन, बेसीन, नळ यासाठी 60 लाख 67 हजार रु., मिटरींग की ऑस्क 9 लाख 50 हजार मिळून एक कोटी रु. खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
महिला व बाल रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी राऊत व नाईक यांनी जोरदार पाठपुरावा केला होता. पालकमंत्री सामंत यांनी अधिकाऱयांसह पाहणी केली होती. वीज पुरवठय़ाचे काम पूर्ण करण्यात आले होते. अंतर्गत कामे लवकर पूर्ण झाली की, रुग्णालय सुरू होईल. साहजिकच लोक विशेषत: महिला व बालकांवर उपचार करण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे आमदार नाईक यांनी सांगितले.