निफ्टी 168 अंकांनी वधारला -एल ऍण्ड टी नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी भारतीय भांडवली बाजार तेजीसह बंद झाला होता, दुसऱया दिवशी मंगळवारीही बीएसई सेन्सेक्स तब्बल 558 अंकांच्या मजबूतीसोबत बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर निर्देशांकांनी मजबूत हिस्सेदारी प्राप्त केली असून यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि लार्सन ऍण्ड टुब्रो या कंपन्यांचा समावेश राहिला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मजबूतीमुळे बीएसई सेन्सेक्स 557.63 अंकांसह 1.15 टक्क्यांनी वाढून निर्देशांक 48,944.14 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक मात्र 168.05 अंकांसह 14,653.05 वर बंद झाला आहे.
दुसऱया सत्रातील शेअर बाजाराला सावरणाऱया कंपन्यांमध्ये प्रामुख्याने सर्वाधिक नफा कमाईत लार्सन ऍण्ड टुब्रो 3 टक्क्यांसोबत तेजीत राहिली आहे. अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीत राहिले असून दुसऱया बाजूला मारुती सुझुकी, कोटक बँक, नेस्ले इंडिया आणि डॉ.रेड्डीज लॅब आदींचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. धातू कंपन्यांचे समभाग मजबूत स्थितीमध्ये राहिल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग जवळपास 2.5 टक्क्यांपेक्षा अधिकने तेजीत राहिले आहेत.
तेजीची कारणे
जागतिक पातळीवरील अमेरिकन शेअर बाजारातील तेजीचा प्रभाव हा देशातील शेअर बाजारावर राहिल्याचे संकेत आहेत. यामध्ये एफओएमसी (फेडरल ओपन मार्केट कमिटी) च्या बैठकीअगोदरच ट्रेझरी बॉण्डवरील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना जोखिम पत्करण्यास मदत झाली असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे. बँकांमधील गुंतवणुकीला दुपारनंतर तेजी प्राप्त करता आली. बँकांच्या समभागांनी एक टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी प्राप्त केल्यामुळे भारतीय बाजारात तेजीचे वातावरण राहिल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.