इस्रायली महिलेसोबतचा घटस्फोट ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या अंगलट
ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीसाठी इस्रायलमध्ये मोठे संकट उभे राहिले आहे. एका अनोख्या घटस्फोट कायद्यामुळे ऑस्ट्रेलियन व्यक्तीला आता 9999 सालापर्यंत इस्रायल सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या व्यक्तीचे नाव नोम हुप्पर्ट (44 वर्षे) आहे. नोम हुप्पर्ट यांना एक तर इस्रायलमध्ये 31 डिसेंबर 9999 सालापर्यंत रहावे लागेल किंवा भविष्यात स्वतःच्या मुलाच्या विकासासाठी 18 कोटी 19 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
स्वतःच्या मुलाच्या नजीक राहता यावे म्हणून नोम हुप्पर्ट 2012 मध्ये इस्रायलमध्ये आले होते. तर त्याच्या एक वर्षअगोदर त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी इस्रायलमध्ये स्थायिक झाली होती. त्यानंतर त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने इस्रायलच्या एका न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला होता. 2012 मध्ये इस्रायलच्या न्यायायलाने नोम यांच्या देश सोडण्यावर बंदी घातली होती. नोम यांना दर महिन्याला 5 हजार इसायली चलन ‘भविष्याचे कर्ज’ म्हणून फेडावे लागणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
न्यायव्यवस्थेचा शिकार
मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत नोम यांना हे पैसे दर महिन्याला द्यावे लागतील. नोम यांना कुठल्याही कारणास्तव इस्रायल सोडता येणार नाही. 2013 पासून मी इस्रायलमध्ये अडकून पडलो आहे. इस्रायली न्यायव्यवस्थेचे शिकार ठरलेल्या अनेक विदेशी नागरिकांमध्ये मी देखील सामील असल्याचा दावा नोम यांनी केला आहे. इस्रायली युवतीशी विवाह केल्याने हे घडल्याचे नोम म्हणाले. ऑस्ट्रेलियन नागरिक नोम एका औषध कंपनीत केमिस्ट आहेत.
कठोर कायदा
या जीवघेण्या अनुभवाला सामोरे जाणाऱया ऑस्ट्रेलियाच्या लोकांची मदत केली जाऊ शकेल म्हणून हा विषय मांडतोय असे नोम यांनी म्हटले. इस्रायलमध्ये घटस्फोट कायद्याचा अर्थ महिला स्वतःच्या मुलाच्या पित्याच्या प्रवासावर बंदी घालू शकते, जेणेकरून भविष्यात मुलाच्या पालनपोषणासाठी आवश्यक रक्कम मिळत रहावी असा होतो. मुलाच्या पित्याला 21 दिवस तुरुंगात रहावे लागू शकते. एवढेच नाही तर स्वतःच्या उत्पन्नाच्या 100 टक्के रक्कम मुलाच्या पालनपोषणासाठी द्यावी लागू शकते.