पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन : मोपा, झुवारी पुलाच्या एका बाजूचे उद्घाटन शक्य
विशेष प्रतिनिधी /पणजी
गोव्यात येत्या 8 ते 11 डिसेंबरपर्यंत पणजीत भव्य दिव्य असे 9 वे जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याचदरम्यान, झुवारी पुलाच्या एका बाजूचे तसेच मोपा विमानतळ प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक आयुर्वेद प्रदर्शन आणि परिषदेच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत. प्रदर्शन कला अकादमीच्या परिसरात होणार असल्याने तोपर्यंत कला अकादमीचा प्रकल्प रु. 50 कोटी खर्चुन पूर्ण होण्याची शक्यता आहे.
उद्या उघडणार परिषदेच्या कार्यक्रमांचा पडदा
या आयुर्वेद परिषदेमध्ये विविध देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर परिषदेचा पडदा उघडणारा कार्यक्रम उद्या दि. 13 ऑक्टोबर रोजी पणजीत होणार असून केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित राहाणार आहेत. उद्या 13 रोजी दुपारी 12 वा. हॉटेल विवांता, पणजी येथे या परिषदेच्या कार्यक्रमांच्या तपशिलाचा पडदा उघडला जाणार आहे.
मोपा आणि झुवारीची तयारी
प्राप्त माहितीनुसार, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा 12 डिसेंबर रोजी होईल तर दि. 13 डिसेंबर रोजी मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीदिनी झुवारी पुलाच्या एका मार्गाचे तथा पुलाच्या एका बाजूचे उद्घाटन होईल. दोन्ही कार्यक्रमांना पंतप्रधान गोव्यात येतील. मिरामार येथे स्व. मनोहर पर्रीकर यांच्या समाधीचे अनावरण हे देखील दि. 13 डिसेंबर रोजी होणार असल्याचे वृत्त आहे.