मिरज / प्रतिनिधी
मिरज-बेडग रस्त्यावरील आडवा रस्ता येथे भरधाव कारवरील ताबा सुटून घराला जबर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात अविनाश रामचंद्र कुडचे (वय 41, रा. शिवाजीनगर, मिरज) हा चारचाकी चालक जागीच ठार झाला. मंगळवारी रात्री 12.47 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात चारचाकीचा अक्षरश चक्काचूर झाला आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.
मिरज ग्रामीण पोलिस आणि घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, मिरज-बेडग आडवा रस्ता येथून मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अविनाश कुडचे हे कार (एमएच-12-आरके-6660) मधून मिरजेकडे येत होते. आडवा रस्ता नावाच्या वळणावर आले असता त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. कार भरधाव वेगात असल्याने थेट रस्त्यालगत असलेल्या घरावर जावून आदळली. हा अपघात इतका भीषण होती की कारच्या धडके घरही पडले. अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर आसपासचे ग्रामस्थ धावत बाहेर आले असता चालक जागीच ठार झाला असल्याचे दिसून आले. या अपघाताबाबत ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या अपघाताबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.