प्रतिनिधी/ खेड
सोमवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील चोळईनजीक सायंकाळच्या सुमारास दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील 20 कुटुंबातील 75 नागरिकांना पोलादपूर येथील विद्यामंदिरमध्ये स्थलांतरित केले आहे. कशेडची घाटात रस्ता चौपदरीकरण कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग पावसामुळे खाली घसरल्याचे सांगण्यात येत आहे. दगड मातीचे ढिगारेच्या ढिगारे डोंगरावरून खाली कोसळत असल्याने येथील नजीकच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पोलादपूरचे नायब तहसीलदार समीर देसाई, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, नरवीर रेस्क्यू टीमचे पदाधिकारी रामदास कळंबे, दीपक उतेकर यासह आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी व कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू होते. यामुळे काही काळ एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला.