प्रतिनिधी /वास्को
वजन माप खात्याच्या अधिकाऱयांनी रविवारी मुरगाव तालुक्यातील विविध भागात दुकानांवर छापा मारून अवैध माल जप्त केला. गेल्या पाच दिवसांपासून गोव्यात ही कारवाई चालू असून जवळपास दहा लाखांचा माल वजन माप खात्याच्या अधिकाऱयांनी जप्त केला आहे.
काल रविवारी वजन माप खात्याचे अधिकारी नितीन पुरूशन यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगाव तालुक्यातील विविध भागात स्थानिक अधिकाऱयांच्या साहाय्याने काही दुकानांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत अधिकाऱयांच्या हाती बराच माल लागला. हा माल विकताना व्यापाऱयांकडून ग्राहकांची फसवणुक करण्यात येत होती. काही वस्तूंवर किंमत छापलेली नसणे, काही वस्तूंवर वाढीव किंमत छापणे, काही माल अधिकृत वजनापेक्षा कमी असणे, उत्पादन तारीख नसणे तसेच वजन व माप खात्याच्या कायदय़ानुसार अन्य आवश्यक नियमांची पुर्तता न केलेला माल या दुकानांमध्ये आढळून आला. त्यामुळे तो जप्त करण्यात आला. या मालामध्ये बराच माल चतुर्थीनिमित्त विकण्यास ठेवण्यात आलेला होता.
गेल्या पाच दिवसांत वजन व माप खात्याच्या अधिकाऱयांनी अशा प्रकारची कारवाई करताना 43 गुन्हे नोंद केलेले असून जवळपास दहा लाखांचा माल जप्त केलेला आहे. खात्याची ही कारवाई चालूच राहणार असल्याचे खात्याचे अधिकारी नितीन पुरूशन यांनी म्हटले आहे.