वृत्तसंस्था/ पर्थ
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर 12 फेरीला शनिवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेतील गट-1 मधील झालेल्या रात्रीच्या सामन्यात इंग्लंडने सॅम करनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विजयी सलामी दिली. मात्र, या लो स्कोअरिंग सामन्यात अफगाणने इंग्लंडला कडवी झुंज दिली. 10 धावात 5 बळी मिळविणाऱया सॅम करनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
सुपर 12 फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विद्यमान विजेत्या आणि यजमान ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिल्यानंतर इंग्लंड संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात अत्यंत सावधपणे खेळ केला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून अफगाणला प्रथम फलंदाजी दिली. गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत अफगाणला 19.4 षटकात 112 धावात रोखले. त्यानंतर इंग्लंडने 18.1 षटकात 5 बाद 113 धावा जमवित हा सामना 5 गडी आणि 11 चेंडू बाकी ठेवून जिंकला.
अफगाणच्या डावामध्ये इब्राहिम झद्रन आणि उस्मान घनी यांनी 30 धावांचा टप्पा ओलांडला. तिसऱया षटकातच सलामीचा रहमनुल्ला गुरबाज 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर स्टोक्सने सलामीच्या झझाईला झेलबाद केले. त्याने 7 धावा जमविल्या. झद्रन आणि घनी यांनी तिसऱया गडय़ासाठी 27 धावांची भर घातली. इंग्लंडच्या सॅम करनने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत अफगाणच्या फलंदाजांना झटपट गुंडाळले. करनने इब्राहिम झद्रनला अलीकरवी झेलबाद केले. त्याने 32 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा केल्या. स्टोक्सने नजीबुल झद्रनला रशिदकरवी झेलबाद केले. त्याने 1 षटकारासह 13 धावा जमविल्या. सॅम करन, वोक्स आणि मार्क वूड यांनी अफगाणचे तळाचे फलंदाज झटपट गुंडाळले. रशिद खान, मुजिबउर रेहमान आणि फारूकी यांना आपले खातेही उघडता आले नाही. उस्मान घनी नवव्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. त्याने 30 चेंडूत 3 चौकारांसह 30 धावा जमविल्या. अफगाणच्या चार फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. अफगाणच्या डावात 3 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडच्या सॅम करनने 10 धावात 5 तर स्टोक्सने 19 धावात 2, मार्क वूडने 23 धावात 2 तसेच वोक्सने 24 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या फारुखी ओमरझाई आणि मुजिबउर रेहमान यांनी इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून चांगलेच रोखले होते. फारूकीने डावातील पाचव्या षटकात कर्णधार बटलरला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या. त्यानंतर फरीद अहमदने हॅलेसचा बळी मिळविला. त्याने 1 षटकारासह 19 धावा जमविल्या. मुजिबउर रेहमानने डेव्हिड मलानला नबीकरवी झेलबाद केले. त्याने 30 चेंडूत 18 धावा जमविल्या. मोहम्मद नबीने नंतर अष्टपैलू स्टोक्सचा केवळ 2 धावांवर त्रिफळा उडविला. इंग्लंडने 13.5 षटकाअखेर 4 बाद 81 धावा जमविल्या होत्या. हॅरी ब्रुक रशिद खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 7 धावा जमविल्या.
इंग्लंडचा निम्मा संघ 15.2 षटकात 97 धावात बाद झाला होता. पण त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि मोईन अली यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. लिव्हिंगस्टोनने 21 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 29 तर मोईन अलीने नाबाद 8 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे फारूकी, मुजिबउर रेहमान, रशिद खान, फरीद अहमद आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
अफगाण 19.4 षटकात सर्वबाद 112 (उस्मान घनी 30, इब्राहिम झद्रन 32, गुरबाज 10, सॅम करन 10-5, वूड 2-23, स्टोक्स 2-19, वोक्स 1-24), इंग्लंड 18.1 षटकात 5 बाद 113 (लिव्हिंगस्टोन नाबाद 29, मोईन अली नाबाद 8, बटलर 18, हॅलेस 19, डेव्हिड मलान 18, स्टोक्स 2, बुक 7, फारूकी, मुजिबउर रेहमान, रशिद खान, फरीद अहमद, मोहम्मद नबी प्रत्येकी 1 बळी).