सोडतीचे व्ही.सी.द्वारे थेट प्रक्षेपण
कोल्हापूर प्रतिनिधी
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवारी 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (विद्या प्राधिकरण) पुणे येथे सोडत काढली जाणार आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही.सी.द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी व्ही.सी.द्वारे ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित रहावे अशा सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी पत्राद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालकांसह जिह्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये अल्पसंख्यांक शाळा वगळता राज्यातील सर्व अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यता तत्वावरिल प्राथमिक शाळांना पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 टक्के पर्यंतच्या जागा नजिकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षामधील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी 25 टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया https://student.maharashtra.gov या संकेतस्थळावरील आरटीई पोर्टल या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबवण्यात येत आहे. त्यानुसार सामाजिक, वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटीत तसेच विधवा महिलांचे पाल्य, अनाथ, दिव्यांग, एचआयव्ही प्रभावित बालके आदी घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारले आहेत. या प्राप्त अर्जामधून ऑनलाईन सोडत काढली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.