भारत-अमेरिका संबंधांमधील नवे पर्व : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अनेक करार शक्य
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत महत्त्वपूर्ण वाटाघाटी करत आहेत. इनिशिएटिव्ह फॉर क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी (आयसेट) अंतर्गत हा पुढाकार क्वाड बैठकीदरम्यान जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या भेटीवेळी झाला होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे एनएसए जॅक सुलीवन यांच्यात तंत्रज्ञान हस्तांतरणासंबंधी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. 22 जूनपासून सुरू होणाऱ्या मोदींच्या दौऱ्यादरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होतील. क्रिटिकल आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या प्रकारचे तंत्रज्ञान सामील आहे याची माहिती देणे दोन्ही देशांनी टाळले आहे.
नाटोसारख्या सामरिक सहकाऱ्यांना पुरविण्यात येणारे संरक्षण, अंतराळ आणि आण्विक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण तसेच संयुक्त निर्मिती करण्याची तयारी अमेरिकेने आता भारतासोबत दर्शविली आहे. याकरता अमेरिकेच्या संसदेच्या एका समितीने भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शिफारस केली आहे. नाटो प्लस श्रेणीत कुठल्याही सामरिक करारात सामील न होऊ इच्छिणाऱ्या परंतु निष्पक्षता राखून भागीदार होऊ इच्छिणाऱ्या देशांना अमेरिकेकडून सामील करण्यात येते.
सहकार्यातील महत्त्वपूर्ण तरतुदी
अमेरिकेकडून भारत काही महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान इच्छित आहे. सुपर कॉम्प्युटर सर्व्हिलान्ससाठी पाचव्या पिढीच्या उपकरणांच्या पुरवठ्याचा मार्ग याच आराखड्याच्या अंतर्गत खुला होणार आहे. अमेरिकेकडून प्राप्त होणारी अॅडव्हान्स्ड सर्व्हिलान्स उपकरणे सागरी आणि भू सीमांची सुरक्षा मजबूत करू शकणार आहेत. अॅडव्हान्स्ड एआय हे तंत्रज्ञान संरक्षणासोबत विकास प्रकल्पांमध्ये उपयुक्त ठरणार आहे. क्वांटम तंत्रज्ञान सद्यकाळात सर्वात वेगवान कॉम्प्युटिंग आणि डाटा विस्तारात उपयुक्त ठरणार आहे. संरक्षण उद्योगाचा विकास, अंतराळ प्रक्षेपणात सहकार्य आणि नासामध्ये इस्रोच्या तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 6 जी कम्युनिकेशनमध्ये अमेरिकेकडून सहकार्य प्राप्त झाल्यास दूरसंचार क्षेत्रात भारताला मोठी झेप घेता येणार आहे.
12-13 जून रोजी बैठक
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे एनएसए जॅक सुलीवन यांच्यात 12-13 जून रोजी महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या करारांच्या मसुद्यांना अंतिम रुप दिले जाणार आहे. यापूर्वीही दोन्ही देशांच्या एनएसएनी सातत्याने चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी भारताचे अनेक वरिष्ठ अधिकारी अमेरिकेत पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी चर्चा करत आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्या भारत दौऱ्यानंतर भारतीय विदेश सचिव विनय क्वाता हे वॉशिंग्टनला पोहोचले होते. तत्पूर्वी पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी.के. मिश्रा हे अमेरिकेत दाखल झाले होते, स्वत:च्या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जिना रायमोंडो यांच्यासोबत चर्चा केली होती. अमेरिकेच्या वतीने रायमोंडो आणि सुलीवन हेच आयसेट अंतर्गत होणाऱ्या करारांवर काम करत आहेत.