झारखंडमधील घटना
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडच्या गढवा येथे नवजाताचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगात टाकून जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. येथील रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सनी नवजाताचा मृतदेह कचऱ्यात टाकून जाळल्याचा आरोप आहे. पलामू येथील 22 वर्षीय मधुदेवी यांनी येथील रुग्णालयात मुलाला जन्म दिला होता, परंतु जन्मानंतर त्वरित नवजाताचा मृत्यू झाला होता. संबंधित कुटुंब अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी बाहेर गेले असता नर्सनी रुग्णालय परिसरात कचऱ्यासाठीच्या ख•dयात मृतदेह टाकून तो आगीच्या हवाली केला होता. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. कुटुंबीयांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या विरोधात संताप व्यक्त करत संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. चौकशीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे रुग्णालयाचे प्रभारी डॉ. गोविंद सेठ यांनी सांगितले आहे.