सांगरुळ / वार्ताहर
पाचकटेवाडी (ता करवीर) येथील ९ वी पास विद्यार्थिनीने बाथरूम मध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. श्रुती मारुती सुतार ( वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी पाचकटेवाडी येथील कुमारी श्रुती सुतार ही बोलोली येथील स्वयंभू हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ती नववी पास होऊन दहावीच्या वर्गात जाणार होती. तिने सुरुवातीपासूनच दहावीच्या अभ्यासाचे टेन्शन घेतले होते. तिच्या वडिलांनी तिला अभ्यासाचे टेन्शन घेऊ नको असे वारंवार सांगितले होते . दरम्यान आज शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेला जाण्याची तयारी करत होती. श्रुती आंघोळ करण्यासाठी बाथरुम मध्ये गेली होती.बराच वेळ ती बाहेर न आल्याने वडीलांनी बाहेरुन हाक मारली असता तिने काहीच प्रतिसाद न दिल्याने वडिलांनी दरवाजा तोडून बाथरूम मध्ये प्रवेश केला असता तिने साडीच्या साह्याने गळफास लावून घेतल्याची निदर्शनास आले तिला त्या बेशुद्ध अवस्थेतच कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. श्रुतीच्या दुर्दैवी मृत्युनंतर कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला होता. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
शाळेच्या सुरुवातीच्या दिवशीच जीवन संपवले
शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस म्हणून सर्वत्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतोत्सवाचा धुमधडाका सुरू असताना श्रुतीने दहावीच्या वर्गात प्रवेश घ्यावयाच्या पहिल्याच दिवशी अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या करून अभ्यासाला सामोरे जाण्या अगोदरच आपली जीवन यात्रा संपवली आहे ‘यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .