निफ्टीची घौडदौड सुरुच : धातू, औषध कंपन्यांचा आधार
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांच्या निर्देशांकाने नवा विक्रम रचला आहे. यामध्ये सेन्सेक्स 64,000 तर निफ्टी 19,000 च्या जवळ पोहोचत नव्या विक्रमाची नेंद केली आहे. बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स 499 अंकांनी मजबूत राहिला आहे. या अगोदर 63,601 चा टप्पा प्राप्त करत 22 जून रोजी नवा विक्रम सेन्सेक्समध्ये नोंदवण्यात आला होता. यासोबतच निफ्टीनेही आपला नवा विक्रम नेंदवत नवी उंची प्राप्त केली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 499.39 अंकांनी वधारुन निर्देशांक 63,915.42 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 154.70 अंकांनी वधारुन निर्देशांक 18,972.10 वर बंद झाला आहे. निफ्टीने आपला नवा विक्रम या अगोदर 1 डिसेंबर 2022 रोजी करत 18,887.60 चा टप्पा प्राप्त केला होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये बुधवारी निफ्टीत धातू आणि औषध कंपन्यांनी सकारात्मक कामगिरी केली होती. यावेळी अदानी एंटरप्रायेजसचे समभाग 5 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 24 समभाग तेजीत राहिले तर 6 मध्ये घसरण राहिली आहे. यावेळी 2.38 टक्क्यांनी टाटा मोर्ट्सचे समभाग मजबूत राहिले आहेत. यासह सनफार्मा आणि एनटीपीसी यांचे समभाग 2 टक्क्यांनी वधारले आहेत. तर टेक महिंद्रा 0.93 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत.
गुंतवणूकदारांची संपत्ती 2.2 लाख कोटींनी वाढली
बुधवारी बाजारातून गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास 2.2 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. बीएसई सेन्सेक्समधील लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य मागील सत्रात 292.13 लाख कोटी रुपये होते जे वधारुन 294.33 लाख कोटी रुपये झाले असल्याची नोंद आहे.
मजबूत खरेदीमुळे बाजार भक्कम
एलआयआयमधील इनफ्लो आणि चालू खात्यामधील तूट कमी झाल्याची मदत याचा लाभ हा गुंतवणूकदारांना झाला.