मंत्री एच. के. पाटील यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांपैकी ‘गृहलक्ष्मी’ योजनेकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. काही तांत्रिक बाबींमुळे ही योजना लांबणीवर पडली आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत 14 जुलैपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाय या योजनेकरिता तयार करण्यात आलेल्या अॅपला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संमती दर्शविली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री एच. के. पाटील यांनी, गृहलक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीविषयी लवकरच अधिकृत माहिती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली.
गृहिणींना दरमहा 2 हजार रुपये देण्याची गृलक्ष्मी योजना जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता या योजनेंतर्गत ऑगस्टमध्ये गृहिणींच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. अर्ज स्वीकृतीसाठी अॅप तयार करण्यात आले आहे. कितीही अॅप असले तरी सर्व्हर एकच, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
गृहलक्ष्मी योजनेच्या नावे बोगस अॅप
गृहिणींना 2 हजार रुपये देण्याच्या गृहलक्ष्मी योजनेसाठी अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपला मंत्रिमंडळ बैठकीत ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. राज्य सरकारकडून अॅपचे अधिकृतरित्या अनावरण होण्याआधीच सोशल मीडियावर तीन बोगस अॅप व्हायरल झाले आहेत. जनतेची दिशाभूल करण्यासाठी प्ले स्टोअरवर समाजकंटकांनी गृहलक्ष्मी योजनेच्या नावे बोगस अॅप अपलोड केले आहे. गृहलक्ष्मी स्किम, गृहलक्ष्मी योजना अॅप आणि गृहलक्ष्मी योजना अॅप्लीकेशन या नावांनी हे बोगस अॅप तयार केले आहेत. या अॅपद्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे लाटले जाऊ शकतात. त्यामुळे त्यापासून दूर राहणे योग्य ठरेल.