वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडच्या कसोटी संघातील सलामीचा फलंदाज बेन डकेटने कसोटी क्रिकेटमधील आपला एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी येथे लॉर्डस मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळताना बेन डकेटने पहिल्या डावात 134 चेंडूत 9 चौकारांसह 98 धावा झळकाविल्या होत्या.
या सामन्यात डकेटने कर्णधार बेन स्टोक्सला चांगली साथ दिली होती. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डकेटने 112 चेंडूत 9 चौकारांसह 83 धावा जमविल्या होत्या. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 12 सामन्यात 48.19 धावांच्या सरासरीने 1012 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 182 ही डकेटची सर्वोच्च धावसंख्या आहे. चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये डकेटची फलंदाजी बहरली असून त्याने 5 कसोटीत 60.55 धावांच्या सरासरीने 545 धावा जमविल्या असून त्यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. लॉर्डसच्या दुसऱ्या कसोटीत त्याने दोन्ही डावात अर्धशतके झळकाविली होती. तर या मालिकेतील पहिल्या कसोटीत तो दोन्ही डावात 20 धावांचा टप्पा ओलांडू शकला नव्हता.