नाकावाटे शरीरात घुसतो मेंदू फस्त करणारा अमीबा
► वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या अलप्पुझामध्ये दूषित पाण्यात असणाऱ्या फ्री लिव्हिंग अमीबामुळे एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. गुरुदत्त असे नाव असलेला हा मुलगा इयत्ता 10 वीत शिकत होता. त्याला प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस इन्फेक्शन झाले होते.
राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी या मुलाच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे. तसेच दूषित पाण्यात स्नान करणे टाळा, कारण हा अमीबा नाकाद्वारे शरीरात शिरत असल्याचा इशारा त्यांनी लोकांना दिला आहे. गुरुदत्त 1 जुलैपासून अलप्पुझा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत होता. एका धबधब्याखाली स्नान केल्यावर त्याला हे इन्फेक्शन झाल्याचे समोर आले होते.
अमीबा हा साचलेल्या पाण्यात असतो आणि नाकावाटे मेंदूपर्यंत पोहोचतो. हा काही संक्रमक आजार नाही, अशाप्रकारच्या घटना क्वचितच घडतात, यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही. यापूर्वी अशी 5 प्रकरणे घडली आहेत अशी माहिती जॉर्ज यांनी दिली आहे. 2016, 2019, 2020 आणि 2022 मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला होता. या सर्व रुग्णांचा मृत्यू ओढवला होता. या आजाराची लक्षणे ताप, डोकेदुखी, उलटी होणे आणि चक्कर येणे ही आहेत.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलनुसार पीएएम एक ब्रेन इन्फेक्शन असून ती अमीबा किंवा नेगलेरिया फाउलेरी नावाच्या जीवाद्वारे होते. हा अमीबा माती किंवा पाणी म्हणजेच सरोवर, नदी किंवा झऱ्यांमध्ये आढळून येत असतो. याला सर्वसाधारणपणे ‘मेंदू फस्त करणारा अमीबा’ म्हटले जाते. कारण अमीबायुक्त पाणी नाकात शिरल्यावर ते मेंदूला संक्रमित करते. अमेरिकेत दरवर्षी सरासरी तीन जण यामुळे संक्रमित होत असतात.