पुणे / प्रतिनिधी :
मुंबई-बेंगळूर महामार्गावरील नवले पूल परिसरातील अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच असल्याचे दिसत आहे. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कोळसा घेऊन जाणारा ट्रक दुभाजक तोडून रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जाऊन रस्त्यावर पलटी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथे घडली.
अपघातग्रस्त ट्रक साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने कोळसा घेऊन निघाला होता. ट्रक नऱ्हे येथील भूमकर चौकाजवळ आला असता अचानक ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे वेगात असलेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक महामार्गावर असणाऱ्या दुभाजकला धडकला आणि विरूद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोळसा रस्त्यावर पडल्याने वाहतूक थांबविली
दरम्यान, ट्रक पलटी झाल्याने ट्रकमधील सर्व कोळसा महामार्गावर पडल्याने काही काळाकरिता वाहतूक थांबविण्यात आली होती. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक अंमलदार महेंद्र राऊत, सुशांत यादव आदींनी दुर्घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. तसेच जेसीबीने महामार्गावर पडलेला कोळसा हटविण्यात आला असून, पेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला.