‘सुभासपा’ आता भाजपसोबत : उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातही स्थान शक्य
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा) नेते ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवार, 16 जुलै रोजी ही घोषणा केली. एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर ओमप्रकाश राजभर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी एकजुटीत ताकद नसल्यामुळे आपण एनडीएसोबत आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मंगळवारी होणाऱ्या रालोआच्या बैठकीमध्ये आपण सहभागी होणार असल्याचे राजभर यांनी जाहीर केले. रालोआमध्ये दाखल झाल्यामुळे केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये मंत्रिपद देण्यासंबंधी नजिकच्या काळात बोलणी होणार असल्याचे समजते.
एनडीएमध्ये दाखल होण्याची घोषणा करतानाच ओमप्रकाश राजभर यांनी समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. समाजवादी पक्षामध्ये झटपट बदल होत आहेत. मागास, दलित आणि अल्पसंख्याक समुदायाकडे दुर्लक्ष करण्याचे सत्र सुरू असून अखिलेश यादव यांच्याकडून प्रभावी नेत्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या काही दिवसात अखिलेश यादव सहकाऱ्यांच्या भेटीगाठीही टाळत आहेत. त्यांना हैदराबाद आणि पश्चिम बंगालपर्यंत जाऊन चर्चा करण्यासाठी वेळ भेटतो. पण, आपल्या शेजारी बसलेल्या नेत्यांना ते भेटत नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.