वृत्तसंस्था/ मँचेस्टर
2023 अॅशेस मालिकेतील येथे सुरू झालेल्या चौथ्या कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने पहिल्या डावात 592 धावांचा डोंगर रचत ऑस्ट्रेलियावर 275 धावांची भक्कम आघाडी मिळवली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 317 धावात आटोपला होता. इंग्लंडच्या डावात क्रॉलेचे द्विशतक 11 धावांनी हुकले तर मोईन अली, रुट, ब्रुक, कर्णधार स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी अर्धशतके झळकवली. बेअरस्टो 99 धावावर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियातर्फे हॅझलवूडने 126 धावात 5 गडी बाद केले. त्यानंतर चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 12 षटकांत 1 बाद 39 धावा जमविल्या होत्या.
पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले सलग दोन सामने जिंकल्यानंतर इंग्लंडने तिसरा सामना जिंकून आपले आव्हान जिवंत राखले आहे. या चौथ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात लाबुशेन व मिचेल मार्श यांची अर्धशतके आणि स्टार्कच्या नाबाद 36 धावांच्या बळावर 317 धावा जमवल्या. त्यानंतर इंग्लंडने 4 बाद 384 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. स्टोक्स आणि ब्रुक यांनी खेळाच्या पहिल्या सत्रात पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 79 चेंडूत नोंदवली. त्यानंतर कर्णधार स्टोक्सने आपले अर्धशतक 72 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने झळकवले. इंग्लंडच्या 400 धावा 457 चेंडूत फलकावर लागल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत धावांची गती राखली होती. ब्रुकने 80 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडच्या 450 धावा 525 चेंडूत नोंदवल्या गेल्या. कमिन्सने स्टोक्सचा त्रिफळा उडवला. त्याने 74 चेंडूत 5 चौकारांसह 51 धावा जमवताना ब्रुक समवेत पाचव्या गड्यासाठी 86 धावांची भागीदारी केली. ब्रुकने 100 चेंडूत 5 चौकारांसह 61 धावा जमवल्या. हॅझलवूडने त्याला स्टार्ककरवी झेलबाद केले. ख्रिस वोक्स खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाला. त्यानंतर मार्क वूड आणि ब्रॉड हे अनुक्रमे 6 आणि 7 धावावर बाद झाले. यष्टीरक्षक आणि फलंदाज बेअरस्टोने अँडरसनला साथीला घेत शेवटच्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडला 592 धावापर्यंत मजल मारता आली. अँडरसनने केवळ 5 धावा जमवल्या. तर बेअरस्टोने आक्रमक फलंदाजी करताना 81 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 99 धावा झळकवल्या. 107.4 षटकात इंग्लंडचा डाव 592 धावावर समाप्त झाला. हॅझलवूडने 5 तर स्टार्क आणि ग्रीन यांनी प्रत्येकी 2 तर कमिन्सने एक गडी बाद केला. उपाहारावेळी इंग्लंडने 96 षटकात 8 बाद 506 धावपर्यंत मजल मारली होती पण खेळाच्या दुसऱ्या सत्रात बेअरस्टोने आक्रमक फटकेबाजी करून आपल्या संघाला अधिक सुस्थितीत नेले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 90.2 षटकात सर्वबाद 317, इंग्लंड प. डाव 107.4 षटकात सर्वबाद 592 (क्रॉले 189, डकेट 1, मोईन अली 54, रुट 84, ब्रुक 61, स्टोक्स 51, बेअरस्टो नाबाद 99, मार्क वूड 6, ब्रॉड 7, अँडरसन 5, अवांतर 35, स्टार्क 2-137, हॅझलवूड 5-126, कमिन्स 1-129, ग्रीन 2-64), ऑस्ट्रेलिया दु. डाव 12 षटकात 1 बाद 39 (वॉर्नर खेळत आहे 17, ख्वाजा 18, लाबुशेन खेळत आहे 4, वुड 1-4).
(धावफलक चहापानापर्यंत)