दिल्ली, गोव्यात महिलेसह तिघांना अटक : हैदराबादची महिला गोव्यात घेणार होती ‘डिलीव्हरी‘,दिल्ली, बेंगळुरु डिआरआयकडून रॅकेटचा पर्दाफाश
पणजी : परदेशातून गोव्यात येणारे 36 कोटीहून अधिक ऊपये किमतीचे हेरॉईन अमलीपदार्थ (ड्रग्ज) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआयच्या) अधिकाऱ्यांनी दिल्लीतील विमानतळावर जप्त केले. या प्रकरणात दिल्ली व गोव्यात केलेल्या कारवाईत महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. दिल्ली विमानतळावर अटक केलेला संशयित गोव्यात येऊन त्या महिलेकडे हेरॉईनची ‘डिलीव्हरी’ करणार होता. त्याच्यासह या रॅकेटचा नायजेरियन मास्टर माईंड व त्या महिलेलाही गजाआड करण्यात डीआरआयला यश आले आहे. गोव्यात फोफावलेल्या ड्रग्ज व्यवहाराविषयी गेल्याच आठवड्यात आमदारांनी संताप व्यक्त केला होता. सरकारने आपल्या विविध यंत्रणांद्वारे कडक कारवाई करुन या व्यवहाराची पाळेमुळे खणून काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेऊन या व्यवहारात गुंतलेल्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ड्रग्ज व्यवसायामुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे, हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगिलेले असतानाच आता हे तब्बल 36 कोटी रुपयांचे नवे प्रकरण उघडकीस आले आहे. परदेशांतून ड्रग्ज गोव्यात येतात आणि गोव्यातून त्याचे देशाच्या विविध भागात वितरण होते, हे पुन्हा एकदा या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
हैदराबादहून आली महिला
बेंगळुरु व दिल्लीतील डीआरआयकडून गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला होता. तिथे सदर माल घेण्यासाठी एक महिला येणार, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार ड्रग्जची डिलिव्हरी घेण्यासाठी ती महिला शनिवारी सकाळी हैदराबादहून गोव्याला निघाली होती. तिला त्या हॉटेलवरच पडकण्यात आले.
मास्टरमाईंडला दिल्लीत अटक
हैदराबादहून आलेल्या महिलेला अटक करून तिची सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने मान्य केले की आपण या ड्रग्जच्या रॅकेटमध्ये सहभागी आहे. दिल्लीहून ड्रग्ज येणार असून आपण त्याची डिलीव्हरी घेणार होती, असेही तिने सांगितले. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत या रॅकेटचा आंतरराष्ट्रीय मास्टर माईंड असलेल्या नायजेरियन युवकाला अटक केली.
दिल्ली विमानतळावर पकडले 36 कोटींचे घबाड
या रॅकेटमधील पहिली अटक दिल्ली विमानतळावर शनिवारी झाली होती. भारतीय असलेल्या या गुन्हेगाराचे मलावी येथून आदिस व्हाया अबामामार्गे शनिवारी दिल्लीत आगमन झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर त्याला रोखण्यात आले होते. ही माहिती गोव्यात दाखल झालेल्या हैदराबाद येथील महिलेला मिळाली नव्हती. दिल्ली विमानतळावर ज्याला अटक करण्यात आली, त्याच्या तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये दोन वेगवेगळ्या पॅकेजमध्ये याने लपवून ठेवलेले सुमारे 5.2 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आणि त्यालाही अटक करण्यात आली.
परदेशातून चालते ड्रग्स रॅकेट
ड्रग्जचे हे रॅकेट परदेशातून चालवले जात आहे. कस्टम अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणातील पहिली अटक शनिवारी दिल्ली विमानतळावर करण्यात आली होती. डीआरआय मुख्यालय आणि डीआरआय बेंगळुरू यांना 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय ड्रग्स स्मगलिंग रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे पुढील कारवाई करून गोव्यात येणारा ड्रग्ज जप्त करून संशdियातांना अटक करण्यात यश आले.