वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात शेअरबाजारात 1.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याआधी 2020-21 आर्थिक वर्षात सर्वाधिक 2.74 लाख कोटी रुपयांची विदेशी संस्थात्मक गुंतवणूक झाली होती. त्यामुळे तसे पाहता 1.48 लाख कोटी ही दुसरी मोठी गुंतवणूक मानली जात आहे.
जुलैत आतापर्यंत 45,365 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात गुंतवले आहेत. 2014-15 मध्ये 1.11 लाख कोटी, 2012-13 मध्ये 1.40 लाख कोटी, 2010-11 मध्ये 1.10 लाख कोटी शेअरबाजारात गुंतवण्यात आले होते. आजवरच्या कॅलेंडर वर्षांवर विचार केला असता विक्रमी गुंतवणूक 1.70 लाख कोटी इतकी 2020 मध्ये झाली होती.
का वाढली गुंतवणूक
डॉलर निर्देशांकात असणारी कमकुवतता आणि चीनमध्ये गुंतवणूकदारांमध्ये घटलेला विश्वास या कारणामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात शेअरबाजारात गुंतवणूकीला प्राधान्य दिले होते. मार्चनंतर शेअरबाजारात गुंतवणूकीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मार्चमध्ये 7936 कोटी रुपये, एप्रिलमध्ये 11,631 कोटी, मेमध्ये 43,838 कोटी आणि जूनमध्ये 47,148 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.