जून तिमाहीचा निकाल जाहीर : मागच्या वर्षी तोटा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बीपीसीएल या कंपनीच्या पाठोपाठ आता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आयओसीएलने जूनअखेरच्या तिमाहीत दमदार नफा कमावला असल्याची माहिती आहे. नफा कमाईत कंपनीने 10 वर्षाचा विक्रम मोडीत काढल्याचे सांगितले जात आहे.
आयओसीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीत 13 हजार 750 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. एक वर्षाआधी याच अवधीत कंपनीने 1992 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. यापूर्वी कंपनीने जानेवारी ते मार्च 2013 कालावधीत 14 हजार 513 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. त्यानंतर आता दहा वर्षानंतर वरीलप्रमाणे मोठा नफा कंपनीने पदरात पाडून घेतला आहे. मार्च तिमाहीत 10 हजार 58 कोटींच्या तुलनेत नफ्यात 37 टक्के वाढ नोंदवली आहे. कच्च्या तेलाच्या किमती व इंधनात मार्जिनमध्ये दिसलेली सुधारणा याचा परिणाम कंपनीला नफा वाढण्यात हातभार लावणारी ठरली. कंपनीने पहिल्या तिमाहीत 2.21 ट्रीलीयन रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात 13 टक्के घट झाली आहे.
जेटीएल इंडस्ट्रिजचा समभाग उच्चांकावर
मुंबई : वेल्डेड स्टील पाइप्सच्या निर्मितीतील कंपनी जेटीएल इंडस्ट्रिज यांचा समभाग सोमवारी शेअरबाजारात 52 आठवड्यानंतर उच्चांकी भावावर कार्यरत असताना दिसला आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या पहिल्या तिमाहीचा निकाल घोषित केला असून जूनच्या तिमाहीत दुप्पटीसह 25.37 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला आहे. जेटीएलचा समभाग 2 टक्के वाढत शेअरबाजारात सोमवारी इंट्रा डे दरम्यान 388 रुपयांवर कार्यरत होता. जून तिमाहीत कंपनीने 38 टक्के वाढीसह 504 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.