सरकारकडून ब्लाईंड डेटिंगचा कार्यक्रम
अनेक देशांमध्ये घटती लोकसंख्या मोठ्या चिंतेचा विषय ठरला आहे. दक्षिण कोरिया देखील या समस्येला सामोरा जात आहे. दक्षिण कोरियाने आता लोकसंख्या वाढविण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला असून याला ब्लाइंड डेटिंग नाव देण्यात आले आहे. तेथील सरकारने याकरता निधीही उपलब्ध करून दिला आहे.
दक्षिण कोरियाचे सरकार ब्लाइंड डेटिंग कार्यक्रम आयोजित करून तरुण-तरुणींमध्ये विवाहाची इच्छा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तेथे ब्लाइंड डेटिंगच्या आयोजनांना मोठी लोकप्रियता मिळून देखील युवांचा विवाह करण्याकडे कल दिसून येत नाही. याकरता सर्वात मोठे कारण मुलांच्या देखभालीवर होणारा खर्च आहे. याचबरोबर देशात शासकीय नोकरीची शक्यता खूपच मर्यादित असून अधिक वेळेपर्यत काम करावे लागत असल्याने लोकांमध्ये कुटुंब सुरू करण्याची इच्छा मागे पडू लागली आहे.
तर डेटिंग ही व्यक्तिगत इच्छा असुन यात सरकारने हस्तक्षेप करू नये असे काही लोकांचे म्हणणे आहे. सरकारने वर्क लाइफ बॅलेन्स, लैंगिक समानता यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियात विवाहाचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. 2021 मध्ये अमेरिकेत दर 1 हजार लोकांमागे 6 विवाह व्हायचे. तर दक्षिण कोरियात दर 1 हजार लोकांमध्ये 3.8 विवाह होतात.
सरकारने याचमुळे मॅचमेकिंगमध्ये रुची कायम ठेवण्यासाठी आयोजनांचे सत्र आरंभिले आहे. सेओंगनाम शहराची लोकसंख्या सुमारे 10 लाख असून तेथील प्रशासनाने ब्लाइंड डेटिंग आयोजनसाठी 1 कोटी 59 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तर दक्षिण कोरियाचे सरकार पूर्ण वर्षभर आणखी ब्लाइंड डेटिंग आयोजन करण्याचा विचार करत आहे.