वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 सालातील प्रतिष्ठेच्या महिलांच्या आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे यजमानपद झारखंडमधील रांची भूषविणार आहे. सदर घोषणा मंगळवारी हॉकी इंडिया आणि झारखंड शासन यांनी संयुक्तपणे केली आहे.
महिलांची सातवी आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा रांचीत 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेता जपान, विद्यमान उपविजेता कोरिया, चीन, मलेशिया, थायलंड आणि यजमान भारत हे सहभागी होत आहेत. भारती महिला हॉकी संघाने 2016 साली ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2018 साली झालेल्या या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
2012 ते 2015 या कालावधीत रांचीमध्ये हॉकी इंडिया लिग स्पर्धेतील अनेक सामने यशस्वीपणे भरवले गेले. रांचीमध्ये सर्वसुविधानिशी अद्यावत स्टेडियमची निर्मिती करण्यात आली असून या स्टेडियममध्ये अनेक अव्वल राष्ट्रीय स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत. भारतीय हॉकी इतिहासात झारखंडचे योगदान मोठे आहे. आतापर्यंत झारखंडने भारताला सात ऑलिम्पिक हॉकीपटू उपलब्ध करून दिले आहेत. जयपाल सिंग मुंडा, सिलबेनस डुंगडुंग, मनोहर टोपनो, अजित लाक्रा, निक्की प्रधान, सलिमा टेटे आणि दिवंगत मायकेल किंडो तसेच दिवंगत मेरांग गोमके यांचा समावेश आहे. महिलांची आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा भरवण्याची संधी मिळाल्याबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हॉकी इंडियाचे आभार मानले आहेत. सदर आगामी स्पर्धा मोठया प्रमाणात यशस्वी केली जाईल अशी ग्वाही झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांचे आपण स्वागत करत असल्याचे मुख्यमंत्री सोरेन यांनी सांगितले.