वृत्तसंस्था/ सलालह (ओमान)
येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या आशियाई हॉकी 5एस विश्वचषक पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने मलेशिया आणि जपान यांचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. गुरुवारी भारताने दोन सामने जिंकत शेवटच्या चार संघात प्रवेश केला.
भारताने गुरुवारच्या पहिल्या सामन्यात मलेशियाचा 7-5 अशा गोलफरकाने पराभव केला. भारताला या सामन्यात मलेशियाने चांगलेच झुंजवले. भारताच्या गुरुज्योत सिंगने दर्जेदार कामगिरीचे दर्शन घडवताना 5 गोल केले. तर भारताच्या मनिंदर सिंग आणि मोहमद राहिल यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. मलेशियातर्फे आरिफ इसाक, इस्माईल अबु, मोहमद दीन, कमरुद्दीन व सियारमन मॅट यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यात पूर्वार्धात उभय संघाकडून 12 गोल नोंदवले गेले. गुरुज्योत सिंगने सातव्या, 11 व्या, 17 व्या, 29 व्या, 30 व्या, मनिंदर सिंगने 12 व्या, मोहमद राहिललने 21 व्या मिनिटाला गोल नोंदवले. मलेशियाच्या इसाकने सहाव्या, इस्माईल अबूने सातव्या, दीनने आठव्या, कमरुद्दीन 26 व्या तर मॅटने 30 व्या मिनिटाला गोल केले. सामन्याच्या उत्तरार्धात एकही गोल नोंदवला गेला नाही.
दुसऱ्या सामन्यात भारताने जपानचा 35-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या समान्यत भारताकडून जपानवर गोलांचा वर्षाव झाला. भातीय संघातील मनिंदर सिंगने 10 गोल तर मोहमद राहिलने 7 गोल, पवन राजबरने 5 गोल, गुरुज्योत सिंगने 5 गोल, सुखविंदर सिंगने 5, कर्णधार मनदीप मोरने 3 गोल, जुगराज सिंगने 1 गोल केला. जपानतर्फे एकमेव गोल मासातेका कोबोरीने नोंदवला. भारतीय संघ हे दोन सामने जिंकत इलाईट गटात 12 गुणासह दुसरे स्थान मिळवले. तसेच भारताला या गटातून थेट उपांत्य फेरी गाठता आली. आता भारताचा उपांत्य फेरीचा सामना शनिवारी होत आहे. भारताने इलाईट गटातून पाच सामन्यातून 12 गुण मिळवले आहेत. या स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात मलेशियाचा 15-1 त्यानंतर ओमानचा 12-2 असा पराभव केला होता मात्र तिसऱ्या सामन्यात भारताला पाककडून 5-4 अशी हार पत्करावा लागली होती.
इलाईट गटातून मलेशियाने तिसरे स्थान मिळवले आहे. मलेशियाने पहिल्या सामन्यात ओमानचा 10-4, दुसऱ्या सामन्यात जपानचा 18-2 तर तिसऱ्या सामन्यात त्यांनी बांगलादेशचा 10-5 असा पराभव केला होता. मलेशियाला भारताकडून 5-7 अशी हार पत्करावी लागली. या स्पर्धेत जपानची कामगिरी निकृष्ट झाली. त्यांना पहिल्या सामन्यात पाकने त्यांचा 26-1 असा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात मलेशियाने जपानचा 18-2 तर तिसऱ्या सामन्यात ओमानने त्यांचा 14-4 असा पराभव केला. बांगलादेशने जपानला 10-3 असे हरविले होते. जपानला शेवटच्या सामन्यात भारताने एकतर्फी पराभूत केले. त्यामुळे इलाईट गटात जपान शेवटच्या स्थानावर राहिल. चॅलेंजर गटात इराण पहिल्या स्थानावर आहे. इराणने पहिल्या सामन्यात हाँगकाँगचा 7-2, तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाचा 5-3, तिसऱ्या सामन्यात कझाकस्तानचा 12-8, चौथ्या सामन्यात त्यांनी अफगाणचा 12-2 असा फडशा पाडला.