साहस, धाडस, थरार-मनोरंजन मिळणार पाहायला
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्कस म्हटले की मुलांबरोबरच महिला आणि ज्येष्ठांनाही मनोरंजनाचा आणि धाडस, साहस, थरार पाहण्याचा आनंद मिळतो. पूर्वीच्या सर्कसमध्ये आणि आताच्या सर्कसमध्ये आमूलाग्र बदल झाला तरी साहस, धाडसाबरोबर मनोरंजनाकडेही सर्कस वळत आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव पाहायला मिळतो. शनिवारी बेळगाव येथे रेम्बो सर्कसला सुरुवात झाली असून साऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्कस चालकांनी केले आहे.
बेळगाव येथील सीपीएड मैदानावर या सर्कसला सुरुवात झाली आहे. सर्कसचे दररोज तीन खेळ होणार आहेत. दुपारी 1, दुपारी 3 व सायंकाळी 7 अशा वेळेत सर्कसमधील खेळ पाहायला मिळणार आहेत. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दुपारी 3 व सायंकाळी 7 या वेळेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
चकचकीत पोषाख केलेली, मुले-मुली पुन्हा एकदा साऱ्यांनाच पाहायला मिळणार असून त्यांचे थरारक खेळ अनुभवायला मिळणार आहेत. विदुषक साऱ्यांचेच मनोरंजन करणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये कला तसेच जादुगिरीही दाखविली जाणार आहे. उंच झुल्यावर कोलांट्या मारत आपली कला दाखविणार आहेत. त्यामुळे बेळगावकरांना सर्कसचा आनंद लुटायला मिळणार आहे.
सध्या सर्कसमध्ये जंगली प्राण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या सर्कसमध्ये एकूण 102 कलाकारांचा सहभाग आहे. ऑक्टोबर 17 पर्यंत हा सर्कस बेळगावमध्ये राहणार आहे. बेळगावकरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.