शिपुगडे तालीम मंडळांचा आदर्श गणेशोत्सव.
सुधाकर काशीद कोल्हापूर
आमच्या गणपतीला नवस म्हणून सोन्या-चांदीचे अलंकार सोन्याचा मुकूट लागत नाही. आमच्या गणपतीला रोज गोडधोड मिठाईचा प्रसाद लागत नाही. आमच्या गणपतीला सजावटीसाठी लखलखाट लागत नाही… आमच्या गणपतीला कर्णकर्कश साऊंड सिस्टीम तर अजिबात चालत नाही… एवढेच काय.. असे काहीही भारी आमिष दाखवले तरी आमचा गणपती नवसाला पावत नाही…
असे स्पष्ट सांगण्याचे धाडस कोल्हापुरातील शिपुगडे तालीम मंडळाने दाखवले आहे.
गणपती जरूर पावतो. पण तो फक्त मन:पूर्वक भक्ती करणाऱ्यांना गरीबांची सेवा करणाऱ्यांना.., हा या मंडळाचा सौजन्यशील असा दावा आहे. कोल्हापुरात जिकडे-तिकडे नवसाला पावणारा गणपती म्हणून फलक लावून गल्लीचा राजा, प्रभागाचा सम्राट.. अशी जाहिरातबाजी सुरू असताना शिपुगडे तालीम मंडळाने वास्तवातला गणेशोत्सव जपण्याची आपली परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
जुना बुधवार पेठेतील शिपुगडे तालीम मंडळ 166 वर्षांपूर्वीचे आहे. अनेकांना माहिती नाही, पण ब्रह्मपुरी म्हणजे कोल्हापूरचे मूळ असे सांगितले जाते. पण त्या बरोबरीने केसापूर पेठेचाही पुरातत्त्व विभागाच्या कागदपत्रात मूळ कोल्हापूर म्हणून उल्लेख आहे. अतिशय दाटीवाटीची वस्ती, छोटे-छोटे गल्लीबोळ अशी केसापूर पेठेची रचना आहे. केसापूर नावाची एक पेठ कोल्हापुरात आहे, हे खूप कमी जणांना माहिती आहे. पेठेच्या प्राचीन महत्त्वाचा अस्सल पुरावा देणारी एक जैन बस्ती या ठिकाणी आहे. या केसापूर पेठेचा केंद्रबिंदू म्हणजे शिपुगडे तालीम आहे.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना लपून राहण्याचे ठिकाण म्हणून या तालमीची स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आगळीवेगळी नोंद आहे.
ही तालीम 166 वर्षांपूर्वीची आहे. कोल्हापूरची सामाजिक, सांस्कृतिक परंपरा या तालमीने सातत्याने जपली आहे. जे सत्य आहे ते ठामपणे मांडण्यावर तालमीच्या कार्यकर्त्यांचा भर आहे. त्यांनी यावर्षी आमचा गणपती कसल्याही आमिषाला पावत नाही.., हे सांगून वास्तव दाखवले आहे. या काळात असे सत्य सांगणेही अशक्य झाले आहे. उलट नवसाला पावणारा गणपती म्हणून मोठमोठ्या जाहिराती करून काही मंडळे गणेशोत्सव सोहळा साजरा करत आहेत. अशा गणपतीच्या दर्शनासाठी रांग ही मोठी आहे. तेथे महापूर आहे, आपल्या देव्हारातल्या गणपतीपेक्षा अशी या जाहिरात करणाऱ्या गणपतीवर लोकांची ‘श्रद्धा’ आहे. या पार्श्वभूमीवर तालीम मंडळाच्या नव्या-जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव विधायकतेकडे नेण्यासाठी यावर्षी खूप चांगल्या आवाहनाची किनार जोडली आहे. कोल्हापूरचे मूळ पुरोगामीत्व जपण्याची त्यांची ही कायम सुरू असलेली धडपड आहे.
मंडळाचे कार्यकर्ते शुभम भणगे, आदित्य पगडे, कुणाल भणगे, समर्थ रेडेकर, प्र्रज्वल चेने, शिवम चित्रुक, शुभम सावंत, प्रणित इंगळे, प्रणव डांगे, प्रणव कोठावळे यासह ज्येष्ठ कार्यकर्ते अमोल डांगे, पंडित डांगे, शशिकांत जाधव, श्रीधर जाधव, सतीश डांगे, यासह असंख्य कार्यकर्ते हा विधायक गणेशोत्सव एका वेगळ्या जाणीवने करत आहेत.
शिपुगडे तालीम मंडळाचे आवाहन…
देवाला फक्त नमस्कार करा. गोरगरीबांना मदत करा. सोने चांदी अर्पूनी काय तुम्हा मिळते? दागिन्याचा होतो लिलाव.
काय उपयोग सांगा या दानधर्माचा…