डग लार्सन यांच्या पत्नी अन् मुलानेही गमाविला जीव
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
अमेरिकेच्या युटा प्रांतात झालेल्या एका विमान दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. एका छोट्या विमानाने युटाच्या मोआब शहरातील कॅन्यनलँड्स क्षेत्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणाच्या काही वेळानंतर हे विमान युटाच्या दुर्गम भागात कोसळल्याची माहिती ग्रँड काउंटी शेरिफ कार्यालयाकडून देण्यात आली.
विमानाचा वैमानिक, नॉर्थ डकोटा प्रांताचे खासदार डग लार्सन, त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सिंगल इंजिन पाइपर पीए-28 विमान रविवारी रात्री दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती युएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिली आहे.
नॉर्थ डकोटाचे गव्हर्नर डग बर्मन यांनी या दुर्घटनेवर अतीव दु:ख व्यक्त केले आहे. सिनेटर लार्सन, त्यांच्या पत्नी एमी आणि दोन छोट्या मुलांच्या मृत्युमुळे अत्यंत दु:खी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युटामध्ये झालेल्या या विमान दुर्घटनेची युएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन आणि युएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाकडून चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी एनटीएसबीच्या निर्देशनाच्या अंतर्गत पार पडणार आहे.