केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
► वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम
लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पी. पी. मोहम्मद हे दोषीच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आपल्या दोषीत्वाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी त्यांची याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मोहम्मद यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असून कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी धरले आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती.
तथापि, उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण जेव्हा प्रथम उघडकीस आले तेव्हा मोहम्मद यांच्यावर अभियोग सादर करण्यात आला होता. त्यांना कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. ती शिक्षा 2 वर्षांहून अधिक काळाची असल्याने त्यांना नियमानुसार लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले. तेथे प्रारंभी त्यांचे दोषीत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व पुन्हा प्रस्थापित करण्यात आले होतें. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.
निर्णय फिरविला
सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवत पुन्हा सुनावणी करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा केरळ उच्च न्यायालयात धाव घेऊन दोषीत्व स्थगित करावे अशी मागणी केली होती. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने दोषीत्व स्थगित करण्यास नकार देऊन केवळ शिक्षेच्या क्रियान्वयनाला स्थगिती दिली. परिणामी त्यांचे दोषीत्व राहिले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
10 वर्षांची शिक्षा होती
पी. पी. मोहम्मद यांना प्रारंभी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा दिली होती. त्यांच्यासह अन्य तीन आरोपींनाही हीच शिक्षा देण्यात आली होती. पी. साहिल यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप या चारही आरोपींवर ठेवण्यात आला होता. त्यासंबंधात ही शिक्षा होती.