2020 मध्ये पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कोट्यवधींच्या मेफेड्रोन रॅकेटचा पर्दाफाश केली होती. त्यानंतर अटकेत असलेला ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाला होता. आज त्याला अटक करण्यास मुंबई पोलीसांना यश आले असून चौकशीसाठी नेताना मी पळालो नाही मला पळवले गेले असल्याचा आरोप केला आहे. ललित पाटलाने कुणावर आरोप केले हे अजून कळाले नसले तरी या प्रकरणाला आता राजकिय वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री चेन्नई मध्ये एका ठिकाणी छापा टाकून मोफेड्रोन ड्रग्ज रॉकेटर असलेल्या ललित पाटील याला अटक केली. 2020 मध्ये पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मेफेड्रोनच्या कारखान्यावर छापा टाकून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त केले होते. तसेच ललित पाटील यालाही अटक केली होती. 2020 पासून न्यायालयीन कोठडीत असलेला ललित पाटील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. पण त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी हॉस्पीटलमधून फरार झाला होता.
ललित पाटील फरार झाल्यामुळे राजकिय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. या प्रकरणामागे मंत्री दादा भुसे यांचा हात असल्याचा थेट आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारवर आरोप करून ललित पाटील यांच्या पलायनामागे सरकारमधील बड्या नेत्याचा हात असल्याचे सांगितले होते.
ललित पाटील याला चौकशीसाठी नेत असताना त्याने माध्यमांसमोर म्हटले आहे कि, मी ससून हॉस्पीटल मधून पळालो नाही मला पळवले गेले. या प्रकरणात कोण कोण सामिल आहे त्या सर्वांची नावे माध्यमांसमोर सांगणार असल्याचा खळबळजनक विधान ललित पाटील यांनी केले आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकिय नेत्याचा किंवा सरकारमधील बड्या धेंड्याचा समावेश आहे कि नाही यावरून लवकरच पडदा उठणार आहे.