अन्यथा सजग नागरिक म्हणून आम्ही ते बंद करू ; पो. निरीक्षक रुणाल मुल्ला यांना कुडाळवासियांचे निवेदन
कुडाळ :-
कुडाळ शहरासह तालुक्यात अमली पदार्थांची बेकायदा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सेवनामुळे युवा पिढी व्यसनाधीन बनत आहे. सदर अमली पदार्थ विक्रीचे अड्डे लवकरात-लवकर बंद करण्यासाठी कार्यवाही करावी ,अन्यथा आम्हाला सजग नागरिक म्हणून ते बंद करावे लागतील.मग त्यावेळी होणाऱ्या संघर्षाला पोलीस यंत्रणा जबाबदार राहील,असा इशारा कुडाळ येथील नागरिकांनी कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांना सोमवारी सायंकाळी निवेदनाद्वारे दिला आहे. कुडाळ शहारातील युवक मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाच्या आहारी जात आहेत.
नवीन पिढी वाममार्गाला जाण्यापासून रोखण्यासाठी कुडाळ येथील नागरिक एकत्र आले. या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील श्री देव मारूती मंदिर धर्मशाळा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढत चालले आहे. चरस, गांजा, फोकेन, व्हाईट पावडर या अमली पदार्थांच्या बेकायदा विक्रीवर बंदी आणण्यासाठी एकजुटीने पुढे येणे ही काळाची गरज आहे .असे अड्डे कायमस्वरूपी बंद होण्यासाठी सर्वांनी ठोस पाऊले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अँड राजीव बिले, संजय भोगटे, दादा पडते, प्रसाद धडाम,प्रसाद शिरसाट,अतूल सामंत , भाई भोगटे, श्रीराम शिरसाट,महेश बांदेकर , सतीश वर्दम,सुहास बांदेकर, राजेश म्हाडेश्वर, सुनील बांदेकर , संदेश पडते, सतीश सामंत,बाबी बांदेकर, महेश ओटवणेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. या विक्रीवर बंदी आणण्यासाठी तातडीने पोलीस यंत्रणेने कार्यवाही करावी.यासाठी बैठकीनंतर पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, कुडाळ शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढ़ी व्यसनाधीन होत आहे होत आहे. त्यांना अनेक आजार होतात.या अमली पदार्थांची किंमत मोठी असल्याने आर्थिक चणचण भागविण्यासाठी युवक गुन्हेगारी व चोऱ्यांचा अवलंब करीत आहेत. अमली पदार्थ सेवनामुळे भविष्यात मोठ्या शहरांप्रमाणे येथेही गुन्हेगारी व चोरीचे प्रमाण वाढू शकते. अमली पदार्थ विक्रीचे अड्डे लवकरात-लवकर बंद व्हावेत.यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.