खेलो इंडिया मुलींच्या फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित खेलो इंडिया 13, 15, 17 वयोगट मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनादिवशी महावीर, एमएसडीएफ, संत मीरा संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लव्हडेल स्कूलच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी इंचल, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, पॅट्रोन राम हदगल, अमित पाटील, लेस्टर डिसोजा, गोपाळ खांडे, एस एस नरगुडी, अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवदानम, जॉर्ज रॉड्रीग्ज, अरिहंत बल्लाळ, मतीन इनामदार, मानस नायक आदी मान्यवर उपस्थित होते, पाहुण्यांचे हस्ते चेंडू किक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 13 वर्षाखालील मुलींच्या पहिल्या सामन्यात महावीर संघाने बुफा बेळगावचा 1-0 पराभव केला. महावीर तर्फे इंदिरा पावनोजी हिने एकमेव गोल केला. दुसऱ्या सामन्यात एमएसडीएफ संघाने भरतेश सेंट्रलचा 3-0 असा पराभव केला. एमएसडीएफतर्फे अवनी सानिकोप्पने 2 गोल, इफा अत्तरने एक गोल केला. तिसऱ्या सामन्यात संत मीराने युकेएफ खानापूर संघाचा 2-0 असा पराभव केला. 15 वर्षाखालील मुलींच्या सामन्यात एमएसडीएफने भरतेश संघाचा 2-0 असा पराभव केला. एमएसडीएफतर्फे साक्षी चिटगी व वसुंधरा चव्हाण यांनी प्रत्येकी 1 गोल केले.