कामकाजाची पाहणी करून केल्या सूचना
बेळगाव : सदाशिवनगर येथील वाहन गोडावून तसेच अझमनगर येथील विभागीय कार्यालयाला महापौर सविता कांबळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील कामकाजाची पाहणी केली आणि संबंधितांना कामासंदर्भात सूचना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामकाज करणे अवघड झाले होते. मात्र आता आचारसंहिता संपल्याने महापौर तसेच नगरसेवक विविध ठिकाणी भेटी देवून पाहणी करत आहेत. याचबरोबर कामासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करून ती अर्धवट कामे पूर्ण करण्याकडे भर देत आहेत. महापौर सविता कांबळे या शुक्रवारी पहाटेच बाहेर पडल्या. त्यांनी सदाशिवनगर येथील वाहनांच्या गोडावूनला भेट दिली. तेथील कामकाजाची पाहणी केली. वाहनांची योग्यप्रकारे देखभाल करा, अशी सूचना त्यांनी केली आहे. वेळेत कचरा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, वाहनांची दुरुस्ती असेल तर ती वाहने तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, असे सांगण्यात आले. अझमनगर येथील विभागीय कार्यालयामध्ये भेट दिली. त्या ठिकाणी कामकाजाची पाहणी केली आहे. कर्मचारी वेळेत येतात की नाही? तसेच कोणत्या अडचणी आहेत का? याची विचारणा महापौरांनी केली आहे. यावेळी विविध अधिकारीही उपस्थित होते.